उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, सर्वत्र धूळ, खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त नाही
By सदानंद नाईक | Published: February 17, 2024 05:30 PM2024-02-17T17:30:50+5:302024-02-17T17:32:55+5:30
उल्हासनगरसाठी ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला अमृत योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे.
उल्हासनगर : शहरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त केले नसल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याप्रकाराने महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा वादात सापडले आहे.
उल्हासनगरसाठी ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला अमृत योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. गटारीचे पाईप टाकल्यानंतर खोदलेले रस्ते पक्के दुरुस्त केले जात नसल्याने, सर्वत्र माती व धुळीचे साम्राज्य शहरात निर्माण झाले. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची की ठेकेदारांची? असा प्रश्न निर्माण झाला. या धुळीने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून उल्हासनगरचे नाव घेतले जात आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. महापालिका बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे, सुरू असलेल्या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याची टीका होत आहे. तसेच भुयारी गटार योजना ब्ल्यूपिंट शिवाय सुरू असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. जुन्या भुयारीगटार पाईप पेक्षा कमी व्यासाचे पाईप टाकले जात असल्याने, भविष्यात योजना फसण्याची शक्यता विविध राजकीय पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
आरोप-प्रत्यारोप मध्ये सापडलेल्या भुयारी गटार योजनेबाबत आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता संदीप जाधव व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे सविस्तर माहिती देत नसल्याने, योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्या पैकी एकाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. महापालिकेचे प्रमुख म्हणून आयुक्त अजीज शेख यांनी खोदलेले रस्ते दुरस्ती करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्या. अशी मागणी होत आहे.
रस्ता दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची
शहरात सुरू असलेल्या भुयार गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते १८ दिवसात दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. रस्ते दुरुस्तीची कारवाई केली जाणार आहे.
परमेश्वर बुडगे (कार्यकारी अभियंता-पाणी पुरवठा विभाग)
भुयारी गटार योजनेची चौकशीची मागणी
शहरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र टाकण्यात येत असलेल्या अर्धा फुटाच्या आकाराच्या पाईप मधून मैला वाहून जाणार का? असा प्रश्न विविध राजकीय पक्षाचे नेते करीत आहेत.