मीरारोड: विकासकाची परवानगी स्थगित केल्याने मीरारोड मधील नगरसेवक-नागरिकांचे उपोषण स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:24 PM2022-02-02T19:24:48+5:302022-02-02T19:25:53+5:30
मीरारोडच्या शांती नगर वसाहतीतील सेक्टर ६ च्या मोक्याच्या नाक्यावर शांतीस्टार बिल्डरच्या कामास स्थगिती दिल्याने स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी सुरु केलेले उपोषण अखेर सोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर वसाहतीतील सेक्टर ६ च्या मोक्याच्या नाक्यावर शांतीस्टार बिल्डरच्या कामास स्थगिती दिल्याने स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी सुरु केलेले उपोषण अखेर सोडले आहे . परंतु विकासकाने बुधवारी सुद्धा काम सुरु ठेवल्याने नागरिकांच्या तक्रारी नंतर पालिकेने काम बंद करायला लावून साहित्य उचलून नेले.
शांतीनगर वसाहत ही दुर्बल घटकांसाठीची यूएलसी खालील गृहप्रकल्प योजना आहे. मूळ जमिनीची मालकी आजही विकास शांती स्टार यांची नसून इमारती व गृहनिर्माण संस्था होऊन ३५ - ४० वर्ष झाली असताना अजूनही राहिवाश्याना जमिनीची मालकी विकासकाने दिलेली नाही .
दुसरीकडे मोफा कायद्याचे उल्लंघन करून रहिवाश्यांची परवानगी नसताना आरजी भूखंड, मोकळ्या जागेत महापालिकेच्या संगनमताने विकासकाने नवीन बांधकाम परवानग्या मिळवल्या आहेत तसेच आरजी जागेत अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. अश्या प्रकारचे आरोप व तक्रारी सातत्याने होत आहेत.
सेक्टर ६ च्या मोक्याच्या कोपऱ्यावर असलेली अवतार गृहनिर्माण संस्थेच्या वापरातील मोकळ्या जागेवर रहिवाश्यांची संमती न घेता पालिकेने विकासकास बांधकाम परवानगी दिली. १९९५ साला पासून संस्थेने जमिनीचे मालकी हक्क मागून देखील विकासकाने ते दिलेले नाहीत. या प्रकरणी शांती स्टार बिल्डरवर मोफा कायद्या खाली गुन्हा दाखल झाला असल्याचे नागरिक सांगतात .
परंतु पालिका परवानगी रद्द करत नसल्याने स्थानिक नगरसेवक अश्विन कसोदरिया यांनी सेक्टर ६ च्या नाक्यावर बांधकाम सुरु असलेल्या इमारती समोर आमरण उपोषण सोमवार पासून सुरु केले होते . स्थानिक नागरिक देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
उपोषण सुरु केल्या नंतर सोमवारी महापालिकेने पूर्वी झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने शांतीस्टार बिल्डरला बांधकाम स्थगित करण्यास सांगितले . सातबारा नोंदी विकासकाचे नाव नसल्याचा तसेच काही अटीशर्तींचे उल्लंघन आधारे आयुक्त दिलीप ढोले यांनी कामास स्थगिती दिली .
त्या नंतर नगरसेवक व नागरिकांनी मंगळवारी रात्री माजी खासदार मिठालाल जैन यांच्या उपस्थिती उपोषण सोडले .