तुम्ही खाताय, तो बर्फ पिण्याच्या पाण्याचा आहे का?; अन्न सुरक्षा अधिकारी करणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 03:35 PM2022-04-07T15:35:05+5:302022-04-07T15:35:27+5:30
ठाणे: सध्या वाढत्या तापमानामुळे शीतपेयांची मागणी वाढली आहे. पण, या शीतपेयातून जो बर्फ आपण खातो तो पिण्याच्या पाण्याचा आहे ...
ठाणे: सध्या वाढत्या तापमानामुळे शीतपेयांची मागणी वाढली आहे. पण, या शीतपेयातून जो बर्फ आपण खातो तो पिण्याच्या पाण्याचा आहे का? हे पडताळले पाहिजे. तसे नसेल तर ते आराेग्यास घातक आहे. अशा विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आपणही असा बर्फ खाण्यापूर्वी सावधानता बाळगा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
कधीही होऊ शकते बर्फाची तपासणी -
खाद्य बर्फाची गुणवत्ता योग्य नसल्याची तक्रार आल्यास संबंधित हॉटेल किंवा शीतपेय विक्रेत्यांच्या बर्फाची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कधीही तपासणी केली जाऊ शकते. मानद ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड अन्न सुरक्षा मानके याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच त्याची विक्री होणे अपेक्षित आहे.
अशावेळी होऊ शकते कारवाई -
कोरोनामुळे गेली दोन वर्षे अनेक व्यवहार थंडावले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईला गती नव्हती. परंतु, आता पुन्हा बर्फाचे गोळे तसेच शीतपेयांमध्ये बर्फाचा वापर होत असल्यामुळे अशा बर्फाचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे. जर त्याचा अहवाल योग्य नसल्यास संबंधित बर्फ विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
यामध्ये केला जातो बर्फाचा वापर -
- लिंबू सरबत, उसाचा रस, बर्फाचा गोळा यासाठी बर्फाचा विशेषत: वापर होतो.
- खाद्य आणि अखाद्य अशा दोन प्रकारांमध्ये बर्फ मिळतो. पांढरा शुभ्र बर्फाचा खाण्यासाठी तर किंचित निळी शाई वापरलेला बर्फ अखाद्याच्या प्रकारात येतो. बर्फाचा गोळा, उसाचा रस त्याचबरोबर हॉटेलमध्ये वॉटर ट्यूब म्हणूनही तो वापरण्याचा परवाना दिला जातो. अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसारच खाद्य बर्फाची विक्री केली जाते.
- अखाद्य बर्फाचा मासे तसेच पदार्थ टिकविण्यासाठी उपयोग होतो. काही वेळा अस्वच्छ जागेत ठेवलेल्या बर्फाच्या लादीचाही बर्फाच्या गोळ्यासाठी किंवा इतर शीतपेयांसाठी उपयोग होण्याची शक्यता असते. असा बर्फ खाण्यापूर्वी सावधानता बाळगण्याचे आवाहन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केले आहे.
उघड्यावरील बर्फ खाणे टाळा -
उघड्यावरील किंवा अस्वच्छ जागेत ठेवलेल्या बर्फामुळे घशाचा संसर्ग (इन्फेक्शन), न्यूमोनिया, ॲलर्जी, सर्दी, खोकला, विषमज्वर असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे उघड्यावरील बर्फ खाणे टाळावे.- डॉ. राहुल पांडे, एमडी, फिजिशियन, ठाणे.