खासगी कंपन्यांचा पुढाकार, भिवंडीतील उड्डाणपुलांखालील जागांचे होणार सुशोभीकरण
By नितीन पंडित | Published: December 3, 2022 06:56 PM2022-12-03T18:56:24+5:302022-12-03T19:01:15+5:30
कंपन्यांच्या CSR फंडातून जागेचे होणार सजावटीकरण
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील उड्डाणपुलाखाली अनेकांनी आपले बस्तान बसविले आहे तर हातगाड्यांनी देखील अतिक्रमण करत उड्डाणपुलांखालील जागा व्यापली आहे. काही ठिकाणी तर उड्डाणपुलांखाली कचऱ्याचे ढिग टाकले जात असल्याने शरात स्वच्छता व शुशोभिकरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. मात्र खासगी कंपन्यांच्या पुढाकाराने आता उड्डाणपुलांखालील जागांचे शुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील जागा या बकालपणातुन कात टाकणार असून विविध कंपन्यांच्या सी एस आर फंडातुन या जागेचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील स्व राजीव गांधी उड्डाणपुला खालील कल्याण नाका येथील स्व. राजीव गांधी चौक ते हसीन सिनेमा या परिसरात शहरातील वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्या वतीने सी एस आर फंडातून सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी पालिका आयुक्त विजय कुमार म्हसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी टोरेंट कंपनीचे जनरल मॅनेजर अभिजित काळे, अधिकारी सुधीर देशमुख,जनसंपर्क अधिकारी चेतन बदीयानी,पालिकेचे उपायुक्त दीपक झिंजाड,वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी,अभियंता एल पी गायकवाड, संदीप सोमाणी, प्रभाग अधिकारी सुनील भोईर,सोमनाथ सोस्टे,फैजल तातली,आरोग्य विभागाचे जे एम सोनवणे उपस्थित होते.
या परिसरात सुंदर सुशोभीकरण करून त्याची पुढील पाच वर्षे निगा राखण्याचे काम टोरेंट पॉवर कंपनी कडून केले जाणार आहे.या सोबत स्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल व भारतरत्न डॉ एपीजे अबुल कलाम या उड्डाणपुला खालील जागेत सुध्दा लवकरच सुशोभीकरण केले जाणार असून त्यासाठी विविध कंपन्या,बांधकाम व्यवसायिक यांनी स्वारस्य दाखविले आहे त्यामुळे शहराच्या सौन्दर्यात भर पडेल असा विश्वास आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी या प्रसंगी व्यक्त केला .