कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 7, 2023 07:44 PM2023-11-07T19:44:04+5:302023-11-07T19:44:15+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बंदींनी बनविलेल्या वस्तूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
ठाणे : कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काही तरी कौशल्य असावे या हेतूने तसेच, कारागृहात शिक्षा भोगत असतांना बंद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बंदींनी बनविलेल्या वस्तू अतिशय सुंदर असल्याचे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढले. शिक्षा संपल्यावर समाजात ज्यावेळी ते येतील त्यावेळी त्यांना सन्मानाने जगता यावे आणि हे जगत असताना आर्थिक पाठबळ मिळावे, त्यांचा आत्मविश्वास परिपूर्ण असावा यासाठी उपक्रमाचे महत्त्व निश्चित जास्त आहे असेही ते म्हणाले.
कारागृहात शिक्षा भोगत असताना बंदींच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्याकडून कलाकुसरीच्या वस्तू कारागृह प्रशासन बनवून घेतात. दिवाळीच्या मुहुर्तावर विविध ठिकाणी विक्री होत असते. परंतू जाणीवपुर्वक शासन म्हणून बंदींच्या कलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांच्यात उपजत कलागुण आहे आणि तुरुंगात असल्यावर त्यांच्या प्रोत्साहनावर विरजण पडू नये, त्यांच्यातील कौशल्य जपले जावे आणि त्यांच्या पुनर्वसनात अडचणी न येता सुलभपणाने त्यांचे पुनर्वसन करता यावे यासाठी हा उपक्रम राबवला जातो. कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टीकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
हा दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू व प्रदर्शन विक्री केंद्राचे उदघाटन मंगळवारी जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते तर कारागृह अधिक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्यात बंद्यांनी तयार केलेले आकर्षक आकाश कंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर, पाट, चारचकी गाडया, बैलगाडी, रिव्हॉलिग चेअर, हट टाईप कि स्टॅड, मोबाईल स्टँड, तसेच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हात रूमाल, बेकरी उत्पादने,ओटस बिस्कीट, इत्यादी ठेवण्यात आल्या आहेत.