जखमी झालेल्या ढवळी आणि गोकुळीची झाली ताटातूट; ग्रामस्थ हळहळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:31 AM2022-04-29T09:31:20+5:302022-04-29T09:32:19+5:30
उपचारासाठी नेले भिवंडीच्या गोशाळेत : विहिगावात वाहिल्या अश्रुधारा
विशाल हळदे
ठाणे : खड्ड्यात पडून जखमी झालेली कसारानजीकच्या विहिगावातील गाय, ढवळी हिला उपचारासाठी गुरुवारी भिवंडी येथील गोशाळेत नेण्यात आले. पाच दिवसांपूर्वीच तिने गोकुळीला जन्म दिला होता. उपचारासाठी ढवळीला भिवंडी येथे नेणे गरजेचे असल्याने मायलेकीची ताटातूट झाली अन् संपूर्ण विहिगाव शोकाकुल झाले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील विहिगाव येथील तेलम कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली ढवळी गाय १५ दिवसांपूर्वी खड्ड्यात पडून जखमी झाली. कमरेचे हाड मोडल्याने तिला उभे राहता येत नाही. अपघात झाला त्यावेळी ती गाभण होती. पाच दिवसांपूर्वी तिने जखमी अवस्थेतच गोकुळीला जन्म दिला. मात्र गोकुळीला दूध पाजण्यासाठीही तिला उभे राहणे शक्य नसल्याने तिच्यावर उपचार करणे गरजेचे झाले होते. त्यामुळे तिला गुरुवारी भिवंडी येथील गोशाळेत रवाना करण्यात आले.
पशुवैद्य डाॅ. सचिन म्हापणकर यांनी ढवळीची प्राथमिक तपासणी केली. एकाच जागेवर बसून तिला लकवा होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अपघातामुळे तिच्या मागच्या पायांमध्ये त्राण राहिलेले नाही. त्यामुळे मोठ्या झोपाळ्यात बसवून तिच्या पायाला नियमित माॅलिश करणे गरजेचे आहे. अवघ्या पाच दिवसांच्या वासरापासून ढवळीला वेगळे करणे कुणालाही आवडणार नाही. मात्र योग्य उपचारासाठी त्याशिवाय पर्याय नसल्याचे मत डाॅ. म्हापणकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, ढवळीची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन घरी यावी अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. गोकुळीची तिची भेट व्हावी असेच सगळ्यांना वाटत आहे.
ग्रामस्थ हळहळले
भिवंडी येथील पडघ्याजवळ असलेल्या आगाव येथील गोपाळ गोशाळेत गुरुवारी ढवळीला नेले जात असताना संपूर्ण विहिगाव हळहळले.
तेलम कुटुंबीयांतील महिला भावुक होऊन रडू लागल्या. ढवळीला ट्रकमधून नेताना अनेकांनी तिच्या अंगावरून हात फिरवला.