अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:12 AM2024-05-11T06:12:56+5:302024-05-11T06:13:09+5:30
नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला.
सुरेश लाेखंडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेले विजूभाऊ (नाव बदलले आहे) मोलमजुरी करतात. बँकेत गेल्यावर अंगठा देताना त्यांना लाज वाटायची. बहुधा अंगठा देत-देत आपण सरणावर जाणार, अशीच त्यांची धारणा होती. केंद्राच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमात धडे गिरवून विजूभाऊ आता नाव लिहायला शिकले आणि नवसाक्षराची परीक्षाही उत्तीर्ण झाले. आपण साक्षरतेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर त्यांना हर्षवायू होणे बाकी होते.
नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला. ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ७७ निरक्षर पुरुष, महिला, मुले उत्तीर्ण हाेऊन आता साक्षर झाली. यामध्ये सर्वाधिक १० हजार २४८ महिलांचा समावेश आहे. हा कार्यक्रम २०२२-२७ या कालावधीत राबविला जात आहे. यामध्ये १५ व त्यापुढील सर्व निरक्षरांसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्च रोजी राज्यात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर झाली. त्यात चार लाख ५९ हजार ५३३ परीक्षार्थी हाेते. त्यांपैकी चार लाख २५ हजार ९०६ जण उत्तीर्ण झाले.
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशाेक शिणगारे, ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसाेदे यांच्याकडून उत्तीर्ण झालेल्यांचे अभिनंदन करण्यात आल्याची माहिती नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनाेर यांनी ‘लाेकमत’ला दिली. जिल्हाभरातून या परीक्षेला १६ हजार ६८३ परीक्षार्थी बसले हाेते. त्यांपैकी २,९५० महिला व ६५६ पुरुष अनुत्तीर्ण झाले. त्यांची परीक्षा पुन्हा सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे.
आम्हाला वयाच्या या टप्प्यावर शिक्षणाची संधी मिळाली. आम्ही आमचे रोजचे कामधंदे सांभाळून शिक्षण घेत आहोत.
- अरुण भवाने, वांगणी
अनेक कारणांमुळे नियमित शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या निरक्षरांना पुन्हा अक्षरओळख व गणितीय क्रियांसारख्या मूलभूत शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिवाय त्यांच्यात नवी उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला.
- राजकुमार पाटील,
शिक्षक, वांगणी.
गावात शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षण घेता आले नाही; परंतु आता या अभियानामुळे मी वाचन तसेच व्यवहारात उपयोगी गणिती आकडेमोड करू लागल्याचा आनंद वाटतो.
- वनिता बंधू वाघ, चिंचपाडा, शहापूर.
उतारवयात शाळेत जाण्याचा अनुभव आनंदी व उत्साहवर्धक होता. आता मी लिहू शकते, वाचू शकते.
- विमल केशव पाटील, केल्हे, भिवंडी.
पुन्हा एकदा आमच्यात शिक्षणाची गोडी रुजविली गेली. बिकट आर्थिक स्थितीमुळे आमचे शिक्षण थांबले होते. आता नव्याने अक्षरओळख व गणिताची आकडेमोड करताना आनंद मिळतो. - राजेश भोपळे, वांगणी.