‘रील्स’साठी १२० फुटांवरून मारली होती उडी; २६ तासांनंतर ‘त्याचा’ मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 08:49 AM2024-05-07T08:49:52+5:302024-05-07T08:50:02+5:30
जव्हार तालुका हा अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. येथे डोंगर-कपारीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक धबधबे, ओहोळ, नद्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : दाभोसा धबधब्यात स्टंटबाजी व रील्स बनवण्याच्या नादात १२० फुटांवरून उडी मारणे तरुणाच्या जीवावर बेतले. डोहात बुडालेल्या माझ शेख याचा मृतदेह २६ तासांनी अर्थात सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हाती लागला आहे. या घटनेत आणखी एक जण जखमी झाला असून हे दोघेही मुंबई आणि मीरा-भाईंदर येथील रहिवासी आहेत.
जव्हार तालुका हा अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. येथे डोंगर-कपारीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक धबधबे, ओहोळ, नद्या आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ जास्त असतो. मात्र, काही हवसे-गवसे पर्यटकांमुळे चांगले धबधबे बदनाम करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नसतानाही त्यांनी उंचावरून उडी मारली तर त्यांचा मित्र पर्यटक डोहाजवळून त्यांचा व्हिडीओ काढत होता.
धबधब्यात पाणी कमी असल्याने माझ शेख हा वर आलाच नाही, तर त्याचा मित्र जोएफ शेख हा जखमी अवस्थेत कसाबसा वर आला. त्याच्या कमरेला, पायाला, मानेवर जबर मार लागला आहे. ही माहिती मिळताच हिरडपाडा येथील ग्रामस्थ, नगरपरिषद, पोलिस कर्मचाऱ्यांनी माझचा शोध सुरू केला हाेता.
अतिउत्साहामुळे अनेकांचा मृत्यू
मागील काही वर्षांत काळमांडवी धबधबा व दाभोसा धबधब्यात स्टंटबाजी करणाऱ्या काही तरुणांचा अतिउत्साहीपणामुळे मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकालचे तरुण मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता थेट टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे यात तरुणांचा नाहक बळी जात आहे.
१०-१५ फुटांवर स्थानिकही घाबरतात...
स्थानिक अट्टल पोहणारे म्हणतात, आम्ही कधीच एवढ्या उंचावरून उडी मारली नाही. याबाबत स्थानिकांनी सांगितले की, आम्ही एवढे अट्टल पोहणारे असूनही, एवढ्या मोठ्या उंचीवरून डोहात कधीच उडी मारली नाही. तसा अनुभव घेण्याची इच्छासुद्धा झाली नाही. १० ते १५ फुटांवरून उडी घेताना आम्ही घाबरतो. मात्र, या तरुणांनी जीवाची पर्वा न करता इतक्या उंचीवरून उडी घेतल्यामुळे एकाला जीव गमवावा लागला, असे स्थानिकांचे
म्हणणे आहे.