वृद्ध भावांची हत्या करणारा मनोरुग्ण नाही, खरे कारण शोधणे पोलिसांपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:57 PM2024-03-04T13:57:32+5:302024-03-04T13:57:52+5:30
या प्रकरणात ३० वर्षीय आरोपी किशोरकुमार जगन्नाथ मंडल याला पालघर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालघर : तारापूर मोठे कुडन येथील दोन भावांची निर्घृण हत्या करणारा आरोपी हा मनोरुग्ण नाही, हे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. मात्र, निर्घृणतेचा कळस गाठणाऱ्या या हत्याकांडामागचे खरे कारण शोधण्याचे प्रयत्न पालघर पोलिस करत आहे. या प्रकरणात ३० वर्षीय आरोपी किशोरकुमार जगन्नाथ मंडल याला पालघर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तारापूर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या कुडण येथील निवृत्त शिक्षक भीमराव पाटील (८४) आणि मुकुंद पाटील (९२) या दोन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. एका मनोरुग्णाने हे हत्याकांड केल्याचे या घटनेतील प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या जितेश पाटील याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून तपास सुरू केला. तारापूर खाडीत आरोपी लपून बसला होता.
हत्येमागचे कारण काय?
भीमराव पाटील यांनी शेतातील झाडाखाली झोपलेल्या आरोपीला हटकून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्या शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेली कुदळ उचलून भीमराव यांच्या डोक्यात अनेक प्रहार केले. दरम्यान, भावाच्या शोधात आलेल्या मुकुंद पाटील यालाही त्याने ठार केले.
अशा प्रकारे केली अटक
खाडीतील चिखलात लपला असताना आराेपीच्या हातातील पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर बॅटरीचा प्रकाशझोत पडल्यात तो पोलिसांना निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या तोंडात चिखल आणि पोटात दीड लिटर पाणी गेल्याची माहिती वैद्यकीय तपासात समोर आली. शनिवारपासून आरोपी पोलिसांनी विचारलेल्या माहितीला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने तो मनोरुग्ण नसल्याचे निष्पन्न झाले.