हजारो आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा खर्डीतच थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 09:58 PM2023-06-16T21:58:33+5:302023-06-16T21:58:51+5:30
रात्री आठच्या अगोदर या...वेळेत या ,असा आदेश देणारे मंत्री ९ वाजून गेले तरी शिष्ट मंडळाला भेटण्यास आले नव्हते.
शाम धुमाळ
ठाणे - महाराष्ट्रातील राज्यभरातून आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बि-हाड मोर्च्याचा आजचा चौथा दिवस हा बिऱ्हाड मोर्चा नाशिक येथून मंगळवारी १३ जून रोजी गोल्फ क्लब मैदानातून निघाला होता. काल ठाणे जिल्ह्यात प्रवेश केल्यावर या मोर्चेकरांनी मुंबई नाशिक महामार्गावर तीन ठिकाणी महामार्ग रोखून धरले होते. या दोन्ही महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काल संध्याकाळी हा बिऱ्हाड मोर्चा शहापूर तालुक्यातील खर्डी येथे मुक्कामी होते.
आज पुन्हा सकाळपासून हा मोर्चा ठाण्याच्या दिशेने पुढे पायी निघाला होता या दरम्यान आज दुपारी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, भिवडीचे आमदार शांताराम मोरे यांनी खर्डी येथे मोर्चेकरांची भेट घेऊन मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. परंतु हा विषय आदिवासी विकास मंत्र्याशी निगडित असल्याने आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व आदिवासी विकास चे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी चर्चा केली या चर्चेत आज रात्री ८ वाजता मंत्री गावित यांच्या बंगल्यावर मोर्चेकरांचे शिष्टमंडळ बोलवण्यात आले. रात्री 8 वाजता शिष्ट मंडळ मंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून अद्याप मंत्र्यांची भेट झाली नाही.
दरम्यान ५ जणांचे शिष्टमंडळ मुबईकडे गेल्या नंतर बाकी मोर्चेकरी खर्डी जवळील हॉटेल प्रांजली येथे थांबवून ठेवले असून उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, विकास नाईक,शहापूर प्रभारी अधिकारी राजकुमार उपासे, घनश्याम आढाव ,महामार्ग पोलीस अधिकारी राकेश डांगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर ,आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी किल्लेदार ह्या आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह मोर्चेकरांसाठी अन्न,पाणी सुविधासाठी प्रयत्नशील होत्या.
रात्री आठच्या अगोदर या...वेळेत या ,असा आदेश देणारे मंत्री ९ वाजून गेले तरी शिष्ट मंडळाला भेटण्यास आले नव्हते. विशेषतः त्यांनी स्वतः त्यांच्या बंगल्यावर ८ वाजता मोर्चकऱ्यांसोबत बैठक लावली होती परंतु मंत्र्यांनी रात्रीचे ९ वाजून गेले तरी वेळ पाळाली नसल्याचे समजते