कोरोनाने कुंकू हिरावले; सरकारनेही वाऱ्यावर सोडले, ठाण्यातील उदरनिर्वाहाची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:25 PM2022-04-05T15:25:04+5:302022-04-05T15:30:02+5:30
- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू ...
- सुरेश लोखंडे
ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू केली आहे. तहसीलदार अध्यक्ष असलेल्या या मिशनची प्रत्येक आठवड्यात एक बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत सात तालुक्यांत जास्तीत जास्त चार आणि कमीत-कमी केवळ दोन बैठका तहसीलदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने कुंकू हिरावले आणि शासनानेही वाऱ्यावर सोडल्याची चर्चा या परिवारांमध्ये ऐकायला मिळत आहे.
कोरोना महामारीत घरातील कर्ता व कुटुंबप्रमुख दगावल्यामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी दरमहा एक हजार रुपये प्रारंभी म्हणजे ऑगस्टपासून सुरू केले आहेत. पण आताही २०० ते २२५ महिलांना दरमहा पेन्शन सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कोरोना महामारीत आतापर्यंत जिल्ह्यात घरातील कमावते व कुटुंबप्रमुख असलेले ९४५ जण दगावले आहेत. त्यांच्या विधवा पत्नींना आता उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत आहे. सध्या या महिलांपैकी ८५० महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १५७ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत; तर १८ महिलांचे अर्ज नामंजूर झाले. याशिवाय १२९ अर्ज अपात्र ठरले असून, ३३१ अर्जांवर कारवाई सुरू आहे.
जिल्ह्यातील ९४५ विधवा महिलांची तालुकानिहाय माहिती प्रारंभी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविलेली आहे. यासाठी तहसीलदारांना या विधवा महिलांची यादी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महिलांना रेशनकार्ड काढून दिले जात आहे. महिलांची कागदपत्रे संकलित करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात कृती दलाचे पदाधिकारी कार्यरत केले आहेत. या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचा प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात कृती दलाकडून जमा केला जात आहे. याशिवाय आता तहसीलदार अध्यक्ष असलेले ‘मिशन वात्सल्य’ सुरू केलेले आहे. सात महिन्यांत अवघ्या चार ते दोन बैठका या तालुक्यातील घेतल्या आहेत. यामध्ये ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार बैठका झाल्या आहेत; तर उल्हासनगर, अंबरनाथला प्रत्येकी तीन आणि शहापूरला फक्त दोन बैठका या मिशनच्या झाल्या आहेत.
१) सात महिन्यांत कोणत्या तालुक्यात किती बैठका?
तालुका - बैठका
१) कल्याण- ०४
२) मुरबाड- ०४
३) शहापूर- ०२
४) ठाणे- ०४
५) भिवंडी- ०४
६) अंबरनाथ- ०३
७) उल्हासनगर- ०३
१) शहापूर तालुका सर्वात मागे -
- या ‘मिशन वात्सल्य’चे अध्यक्ष असलेल्या शहापूरच्या तहसीलदारांनी सात महिन्यांत अवघ्या दोन बैठका घेतल्याचे वास्तव महिला बालविकास विभागाच्या अहवालावरून उघडकीस आले आहे. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी बैठका घेऊन या महिलांच्या लाभांविषयी आढावा घेतल्याचे दिसून येत आहे.
२) ठाणे, कल्याण, भिवंडी, मुरबाड, सर्वाधिक बैठका -
या चार तालुक्यांनी प्रत्येकी चार बैठका घेऊन या ‘मिशन वात्सल्या’च्या कामाचा आढावा घेतला आहे. या मिशनकडून प्रत्येक आठवड्याला एक बैठक घेणे अपेक्षित आहे. पण त्यांनी आतापर्यंत केवळ चार बैठका घेतल्याचे दिसून येत आहे.