ठाण्यातील बेपत्ता कारागृह शिपाई कल्याणच्या घरी परतला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:31 AM2022-05-26T11:31:05+5:302022-05-26T11:31:17+5:30
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून घर सोडले : ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार
ठाणे : जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरातून गेले चार दिवस बेपत्ता झालेला कारागृह शिपाई अशोक पल्लेवाड (३०, रा. कल्याण) हा त्याच्या कल्याणच्या घरी बुधवारी पहाटे परतला. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. थेट कारागृह अधीक्षकांवर गैरव्यवहाराचे आरोप केल्याने त्याच्या घातपाताची भीती समाजमाध्यमांद्वारे एका कैद्याने व्यक्त केली होती.
कारागृहात पल्लेवाड हे कार्यरत असून ते २१ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास कारागृह परिसरातून अचानक बेपत्ता झाले. पती अशोक हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी ममता यांनी २२ मे रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. एकीकडे त्यांचा शोध सुरू असतानाच ते २५ मे रोजी पहाटे ५ च्या सुमारास त्यांच्या कल्याण येथील घरी सुखरूप परतले.
कैद्याने केला खुनाचा आरोप
याच कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या एका कैद्याने मात्र कारागृह अधीक्षक अहिरराव यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारागृह शिपाई पल्लेवाड यांनी आवाज उठविल्याने त्यांचा खून अहिरराव यांनी केल्याचा संशय व्यक्त केला होता. या कैद्याने ही पोस्ट फेसबुकवर टाकून पल्लेवाड बेपत्ता असल्याची तक्रार व्हायरल केली होती.
तक्रार केल्याने एकटे पाडतात
आपण वरिष्ठांच्या त्रासामुळेच बाहेर पडलो. अधीक्षक अहिरराव हे मेमो काढतात. तक्रार केली तर एकटे पाडतात. यातच भान न राहिल्याने मनमाडला गेल्याचे पल्लेवाड यांनी सांगितल्याचे पोलीस निरीक्षक विद्या पाटील म्हणाल्या.
nघरी सुखरूप परतल्यानंतर त्यांनी स्वत: पोलीस ठाण्यात सायंकाळी येऊन आपली मानसिक स्थिती बरी नसल्याने घर सोडल्याची माहिती दिली.
nठाणे कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याकडून होत असलेल्या मानसिक जाचाला कंटाळल्यामुळे आपण एका मित्राकडे गेल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.
nशनिवारी रेल्वेने मनमाड गाठले. त्यानंतर भानावर आल्यावर पत्नीला फोन केला आणि घरी परतल्याची माहिती त्यांनी चौकशीत ठाणेनगर पोलिसांना दिली.
गुन्हेगारांच्या संपर्कात राहून त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली अशोक पल्लेवाड यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे. त्यामुळेच ते सध्या वारंवार गैरहजर राहतात. तळोजा कारागृहातही एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २१ मे पासून ते विनापरवानगी गैरहजर आहेत. जर कोणाच्याही भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करावी. समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करणे चुकीचे आहे.
- हर्षद अहिरराव, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे.