माेबाइल पुन्हा सापडण्याचे प्रमाण केवळ सव्वा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 11:33 AM2023-05-22T11:33:52+5:302023-05-22T11:34:06+5:30

चार महिन्यांत १,६०० गहाळ : परत मिळाले १८३ माेबाइल

The mobile recovery rate is only about half a percent | माेबाइल पुन्हा सापडण्याचे प्रमाण केवळ सव्वा टक्का

माेबाइल पुन्हा सापडण्याचे प्रमाण केवळ सव्वा टक्का

googlenewsNext

- धीरज परब 
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ झालेले व चोरीला गेलेल्या मोबाइलची संख्या सुमारे १,६०० च्या घरात असून, त्यापैकी केवळ १८३ मोबाइल हस्तगत केले आहेत. त्यामुळे मोबाइल पुन्हा मिळविण्याचे प्रमाण अवघा एक ते सव्वा टक्का इतकेच आहे. त्यातही चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला जात असला, तरी गहाळ झालेल्या मोबाइल प्रकरणात गुन्हा दाखल केला जात नसल्याने, सापडलेले मोबाइल प्रामाणिकपणे परत करण्याचे प्रमाण नाममात्र आहे. 

पोलिस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागातून दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांतील गहाळ मोबाइलची संख्या १ हजार ४६० इतकी आहे. त्यापैकी ६७ मोबाइल पोलिसांना सापडले आहेत. ५२ मोबाइल हे संबंधित व्यक्तींना परत केले गेले. याच कालावधीत मोबाइल चोरीचे ११० गुन्हे दाखल झालेले आहेत, तर ५५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ११६ मोबाइल हस्तगत केले आहेत. ५० मोबाइल नागरिकांना परत केले आहेत. 

प्रवासात विसरण्याच्या घटना अधिक
    रिक्षा, बस, ट्रेन आदींमध्ये प्रवासाच्या दरम्यान वा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाइल विसरण्याचे, पडण्याचे प्रकार हे जास्त हाेतात. त्यामुळे गहाळ मोबाइलच्या नोंदी जास्त आहेत, असे सांगितले जाते. गहाळ झालेला मोबाइल हा कोणाला ना कोणाला सापडलेला असतो. 
    या माेबाइलची विक्री, तसेच वापर करणे हा फौजदारी दखलपात्र गुन्हा आहे. मात्र, पोलिस तसे गुन्हे दाखल करत नसल्याने, चोरटे व लबाडी करणारे मोकाट आहेत.
    पोलिसांनी हरवलेला मोबाइल परत करणाऱ्यांचे कौतुक करणे जसे आवश्यक आहे, तसेच मोबाइल लबाडीने स्वतःकडेच ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. 

विदेशातही हाेते विक्री
गहाळ झालेले मोबाइल हे पुन्हा वापरात आल्यास त्याच्या आयएमईए क्रमांकावरून पुन्हा सापडतात. चोरी झालेले मोबाइल हे देशातच नव्हे, तर ते नेपाळ, बांगलादेशपासून अन्य देशांतही विक्रीसाठी पाठविले जातात. मोबाइलमधील महागडे पार्ट विक्री केले जातात. मात्र, हे खूपच कमी प्रमाण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुलगी रिक्षात प्रवास करत असताना २३ एप्रिल, २०२१ रोजी १२ हजारांचा मोबाइल गहाळ झाला होता. पोलिसांनी त्यावेळी मोबाइल मिळेल, असे आश्वस्त केले होते. नुकताच पोलिसांनी तो मोबाइल परत मिळवून दिला आहे. मोबाइल सुस्थितीत आहे. यामुळे पोलिसांवरील विश्वास आणखी वाढला असून आनंद झाला.
    - बाळासाहेब गोडसे, काशिमीरा

Web Title: The mobile recovery rate is only about half a percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी