रस्त्यांवर वर्षानुवर्ष धुळखात पडलेल्या भंगार गाड्या महापालिकेने उचलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 02:54 PM2022-04-30T14:54:43+5:302022-04-30T14:55:01+5:30
ठाणे : ठाणे शहरातील अनेक प्रभागांत रस्त्यांवर वर्षानुवर्षे कित्येक भंगार गाड्या धूळ खात उभ्या आहेत. या गाड्यांमुळे रस्ते अडवले ...
ठाणे : ठाणे शहरातील अनेक प्रभागांत रस्त्यांवर वर्षानुवर्षे कित्येक भंगार गाड्या धूळ खात उभ्या आहेत. या गाड्यांमुळे रस्ते अडवले जातात; तसेच अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. या विषयाची गंभीर दखल घेत माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले-जाधव यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून या गाड्या उचलण्याची मागणी केली होती. गुरुवारी या भंगार गाड्यांवर पालिकेने कारवाई करीत त्या पालिकेच्या मोकळ्या जागेत जमा केल्या. या कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून, नागरिकांना रस्त्यांवर चालणे सुकर झाले आहे.
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक १९ मधील रस्त्यांवर वापरात नसलेल्या व धूळ खात पडलेल्या खासगी कार, रिक्षा, टुरिस्ट गाड्या यांमुळे रस्ते अरुंद झाले होते. या गाड्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. याबाबत १८ एप्रिल रोजी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या उपायुक्तांना एक लेखी पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती. त्यासोबत भंगार गाड्यांची छायाचित्रेही सादर केली होती. या पत्राची दखल घेत सकाळपासून या भंगार गाड्यांवर कारवाई करण्यात आली. प्रभागातील धूळ खात पडलेल्या १५ गाड्या पालिकेने उचलून बाटा कंपाऊंड येथे महापालिकेच्या मोकळ्या जागेत जमा केल्या.