महापालिकेने तयार केला पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर जोखीम व्यवस्थापन आराखडा
By अजित मांडके | Published: June 22, 2024 03:32 PM2024-06-22T15:32:40+5:302024-06-22T15:32:50+5:30
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले प्रकाशन
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पूर जोखीम व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या ठाणे शहर कृती आराखडा २०२४ चे प्रकाशन शनिवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. हा आराखडा राज्य सरकार आणि कौन्सिल आॅन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर (सीईईडब्ल्यू) या आघाडीच्या थिंक टँकच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त भागांना प्राधान्य देऊन पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहणे आणि जलद प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणेला सुसज्ज करण्याची दिशा मिळणे हा या कृती आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे.
पूर जोखीम व्यवस्थापनासाठी 'सीईईडब्ल्यू' या संस्थेने तयार केलेला ठाणे शहर कृती आराखडा २०२४ हा सर्वसमावेशक आहे. या कृती आराखड्यामुळे ठाणे महापालिकेच्या यंत्रणेला सुप्रशासनासाठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन या प्रकाशन कार्यक्रमात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. यावेळी, नागरिकांना या कृती आराखड्याची माहिती व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचेही प्रकाशन करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्राचा विकास होत असताना नैसर्गिक नाल्यांची स्थिती आमूलाग्र बदलली आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने विचार करून भूमिगत मल:निसारण वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे मोठे आव्हान आता महापालिकेसमोर उभे आहे. त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी 'सीईईडब्ल्यू' या संस्थेने महापालिकेसाठी तयार केलेला हा कृती आराखडा दिशादर्शक म्हणून काम करेल. नवीन प्रकल्प करताना, डीपीची अमलबजाबणी करताना या कृती आराखड्यातील मुद्दे विचारात घेऊनच निर्णय घेतले जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
या आराखड्यामुळे पालिकेची जबाबदारी वाढली आहे. आता हा आराखडा नागरिकापर्यंत घेऊन जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम महापालिका करेल, असेही ते म्हणाले. तसेच, उष्णतेचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यापाठोपाठ हा पूर जोखीम व्यवस्थापन आराखडा तयार झाला आहे. आता पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही यावेळी आयुक्त राव यांनी सांगितले. ठाणे या किनारपट्टीवरील शहराला प्रतिकूल हवामान घटनांपासून सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.
हवामान बदलामुळे शहरात वारंवार होणाऱ्या पूरस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी महापालिका आणि सीईईडब्ल्यूने शहर-स्तरीय पूर कृती आराखडा तयार केला. त्यासाठी गेल्या ५२ वर्षांमधील पर्जन्यमानाची आकडेवारी, सामाजिक-आर्थिक घटक आणि वॉर्ड स्तरावर पूरांमुळे होणारे धोके ओळखण्यासाठी सॅटेलाइट माहिती याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या आराखड्यात कृतीची आवश्यकता, त्वरित उपाययोजनांची अंमलबजावणी, त्यासाठी कालमयार्दा निश्चिती आदी बाबींचा समावेश आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने ही तयारी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सीईईडब्ल्यूचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी यांनी याप्रसंगी केले.