बेकायदा मंडपावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ अन् भ्रष्टाचाराचे आरोप
By धीरज परब | Published: August 27, 2022 09:36 PM2022-08-27T21:36:19+5:302022-08-27T21:38:30+5:30
मीरारोडच्या हटकेश, सालसर गार्डन येथील उज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतले.
मीरारोड - मीरारोडच्या हाटकेश भागात अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचे काम सुरू असल्याने कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोर जावे लागले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोडच्या हटकेश, सालसर गार्डन येथील उज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतले. काशीमीरा पोलिसांनी प्रभाग समिती ४ ला २५ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून , सदर मंडळाने अर्ज केला असला तरी अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवरखाली मंडप धोकादायक ठिकाण असल्याने मंडळास अन्य जागी मंडप उभारण्यास आवाहन करण्याचे पत्र दिले होते.
पोलिसांच्या पत्रानंतर प्रभाग समिती ४ चे पालिका पथक हे महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांसह शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी मंडपाच्या ठिकाणी जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंडप काढण्या बाबत सांगत होते. त्यावेळी आकाश गोपाळ दुबे रा. एस्टर, सैलसर गार्डन ह्याने पालिका पथकास अरेरावी करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. दुबेसह आणखी एका वयस्कर इसमाने पालिकेवर पैसे खाण्याचे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही, एका क्लब वाल्या कडून पैसे खाऊन कारवाई करतात आदी स्वरूपाचे आरोप मोठमोठ्याने ओरडून केले. यामुळे परिसरात गर्दी जमून तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पालिकेचे कर्मचारी महेंद्र गावंड यांच्या फिर्यादी वरून आकाश दुबेवर सरकारी कामात अडथळा तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान महापालिकेसह वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांची परवानगी आल्या शिवाय मंडप उभारण्याचे काम करता येत नसताना देखील बेकायदा मंडप उभारण्याचे काम आधीच सुरु केले जात असल्याने महापालिका पथक व पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यास असले तणावाचे प्रसंग टाळता येऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे.