लेखी पोलीस परीक्षेसाठी येणाऱ्या महिलांची पालिकेने केली राहण्याची सोय
By धीरज परब | Published: March 30, 2023 05:03 PM2023-03-30T17:03:12+5:302023-03-30T17:03:27+5:30
परीक्षेसाठी ३ हजार २६९ महिला उमेदवार असल्याने त्यांची आदल्या दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने राहण्याची मोफत व्यवस्था केली आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीसाठी २ एप्रिल रोजी ३ हजार २६९ महिला तर ८ हजार ८५८ पुरुष उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. तर पात्र महिला उमेदवारांची राहण्याची विनामूल्य सोय महापालिकेने केली आहे.
पोलीस आयुक्तालयातील भरती साठी शारीरिक चाचणी झाल्या नंतर आता पात्र ठरलेल्या १२\ हजार १२७ पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. महिला उमेदवारांची परीक्षा भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात तर पुरुष उमेदवारांची परीक्षा भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात होणार आहे . पोलिसांनी त्यासाठी आवश्यक व्यवस्था केली असून परीक्षा केंद्रच्या १०० मीटर चा परिसर मनाई आदेश काढून प्रतिबंधित केला आहे.
परीक्षेसाठी ३ हजार २६९ महिला उमेदवार असल्याने त्यांची आदल्या दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने राहण्याची मोफत व्यवस्था केली आहे. परीक्षा केंद्र परिसरात असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृह, आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह व स्वर्गीय प्रमोद महाजन सभागृह येथे परीक्षेसाठी येणाऱ्या महिला उमेदवारांना विनामूल्य राहता येणार असल्याचे शहर अभियंता दिपक खांबित यांनी पत्रा द्वारे कळवले आहे.