भूमिपुत्रांनी स्वतःच्या जमिनींवर चालवलेला व्यवसाय पालिका आकसाने करतेय उध्वस्त; ठाकरे गटाचा आरोप
By धीरज परब | Published: December 4, 2022 06:19 PM2022-12-04T18:19:38+5:302022-12-04T18:19:55+5:30
जागा भूमिपुत्रांच्या मालकीच्या असून असून पालिका आरक्षण आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील काही अधिकारी हे आकस ठेऊन भूमिपुत्रांना त्यांच्याच जमिनीवर व्यवसाय करण्यास मनाई करून त्यांचे व्यवसाय उद्धवस्त करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
मीरारोडच्या कनकीया परिसरात असलेल्या नरेंद्र पाटील आदी स्थानिक भूमिपुत्रांच्या मालकीच्या जमिनी आहेत . त्यावर महापालिकेच्या विकास आराखड्यात शाळा आदींचे आरक्षण असले तरी पालिकेने जागा अजून मोबदला देऊन ताब्यात न घेतल्याने त्या मोकळ्या जागेवर स्थानिक आगरी समाजातील तरुणांनी तात्पुरत्या स्वरूपात हॉटेल, टर्फ असा व्यवसाय सुरु केला होता. महापालिकेने कोणतीच नोटीस न देता अचानक येऊन सर्व शेड , टर्फ तोडून टाकत नुकसान केल्याचा आरोप ठाकरे गट युवासेनेचे मीरा भाईंदर प्रमुख पवन घरत आदींनी केला.
महापालिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचे ह्यातून स्पष्ट होत असून ह्या आधी राज्यातील सत्तांतर नंतर जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे , जिल्हा संघटक स्नेहल सावंत , उपजिल्हा प्रमुख शंकर वीरकर यांच्या मालकी जागेतील कच्ची - पक्की बांधकामे अचानक जाऊन तोडण्यात आली. आता घरत यांच्याशी संबंधित शेड आदींवर कारवाई केली गेली असे ठाकरे गटा कडून सांगण्यात आले.
जागा भूमिपुत्रांच्या मालकीच्या असून असून पालिका आरक्षण आहे. तर पालिकेने मोबदला देऊन त्या ताब्यात घ्याव्यात. परंतु आमच्या जागा आणि मोबदला द्यायचा नाही वर आम्हाला व्यवसाय सुद्धा करू द्यायचा नाही हा स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय आहे. आकस व सूडबुद्धीने केवळ ठाकरे गटास लक्ष्य करणे पालिकेने थांबवावे व कारवाई करायची तर रीतसर नोटीस व मुदत द्या, नुकसान जाणीवपूर्वक करू नका . शहरातील अन्य बेकायदा कामांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी पवन घरत यांनी केली.