Mira Bhayander: वरसावे येथील खाडीवरचा नवीन ५ पदरी उडडाणपूल फेब्रुवारी-मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता
By धीरज परब | Published: November 30, 2022 02:23 PM2022-11-30T14:23:43+5:302022-11-30T14:24:36+5:30
Mira Bhayander: गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे .
- धीरज परब
मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे . खाडी वरील मुंबई कडून वसई - सुरत कडे जाणारा नवीन ५ पदरी उड्डाणपूलचे काम बहुतांश झाले असून पुढील वर्षात फेब्रुवारी अखेर किंवा मार्च मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
वसई खाडी वर दोन पूल आहेत . एक जुना पूल कमकुवत झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पूल बंद ठेवावा लागत होता . त्यावरून अवजड वाहनांना मनाई केली गेली तर धीम्या गतीने वाहने जात असल्याने मोठी वाहनकोंडी होऊ लागली . पावसाळ्यात जुन्या पुलांवर खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत . देशाच्या मुख्य राष्ट्रीय महामार्गची अशी बिकट परिस्थिती झाल्याने संताप व्यक्त होत होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५ पदरी नवीन पूल बांधण्यासाठी डिसेंबर २०१६ ला निविदा काढून मार्च २०१७ ला कार्यादेश दिले . मात्र महत्वाच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या त्यामुळे आणि नंतर २०२० सालात कोरोना लागल्याने पुलाचे काम रखडले . पुलाचे काम रखडल्याने येथील वाहतूक कोंडी मुळे नागरिक मात्र रडकुंडीला आले आहेत.
ह्या ठिकाणी नवीन पूल पाच पदरी असल्याने त्या नव्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून वसई व पुढे गुजरात दिशेला जाणारी वाहनं जातील . तर सध्याचा जुना व दुसरा सुमारे १७ वर्षां पूर्वी बांधलेल्या पुला वरून मुंबई - ठाणे कडे जाणारी वाहनं धावतील . मुंबई - मीरा भाईंदर वरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहनं हि उड्डाणपुलाखालून जातील . त्याच प्रमाणे ठाण्या वरून वसई - गुजरात कडे जाणारी वाहनं नवीन उडडाणपुलाला जोडणाऱ्या पुला वरून जातील.
सध्या केवळ नवीन ५ पदरी पूल हा फेब्रुवारी - मार्च दरम्यान पूर्ण होऊन तो आधी वाहनांसाठी खुला केला जाणार आहे . त्या पुलावरून मुंबई - मीरा भाईंदर कडून येणारी व वसई - गुजरात दिशेला जाणारी वाहनं जाणार आहेत . त्यामुळे सध्या वरसावे नाका येथे एकाच जुन्या पुलावरून वसई दिशेने जाणाऱ्या वाहनां मुळे होणारी कोंडी फुटणार आहे.
नवीन पूल सुरु झाल्या नंतर ठाणे वरून वसई - गुजरात दिशेला जाणाऱ्या पुला साठी मोठी अडचण प्राधिकरण व वाहतूक पोलिसांना भेडसावणार आहे . कारण वरसावे नाक्यावर सदर काम करताना वसई - गुजरात वरून ठाण्याला जाणारी तसेच ठाण्या कडून वसई दिशेला जाणारी वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे . तसेच अन्यत्र वळवावी लागणार आहे असे सूत्रांनी सांगितले .
वरसावे नाका येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासह पुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय मंत्रालया कडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे . नवीन उड्डाणपूल नवीन वर्षात फेब्रुवारी वा मार्च पर्यंत नागरिकां साठी खुला करण्याचे प्राधिकरणा कडून आश्वस्त केले गेल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली .