राज्यातील नवे सरकार काहींना हजम होत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 06:35 AM2022-08-27T06:35:55+5:302022-08-27T06:36:13+5:30
आमचा काहीच अजेंडा नाही, फक्त जनतेची सेवा करायची, तिला न्याय द्यायचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास, हाच आमचा अजेंडा आहे
ठाणे-
आमचा काहीच अजेंडा नाही, फक्त जनतेची सेवा करायची, तिला न्याय द्यायचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास, हाच आमचा अजेंडा आहे. मात्र, राज्यात नवे सरकार आलेय, ही गोष्ट काही लोकांना हजम होत नाही. एकनाथ शिंदे कसा डोलारा सांभाळतील, याबाबत ते शंका-कुशंका व्यक्त करतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झाले आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विरोधकांचा समाचार घेतला.
स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तिस्थळावर येऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिघे यांना अभिवादन केले. त्यानंतर दिघे यांच्या आठवणींना उजाळा देताना विरोधकांचाही समाचार घेतला. काही लोकांना राज्यातील नवे सरकार आलेय, ही गोष्ट हजम होत नाही, काहींच्या घशाखाली हे उतरत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले. त्यामुळे शिंदे हा डोला सांभाळतील किंवा कसे याबाबत ते संशय घेत आहेत. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून दोन महिन्यांत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमचा काहीच अजेंडा नाही, आमचा अजेंडा शून्य आहे. फक्त जनतेची सेवा, जनतेला न्याय आणि या राज्याच्या सर्वांगिण विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितलं.
आनंद दिघे हे आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत, त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. त्यांच्यावरील सिनेमात त्यांचा सर्व जीवनपट उलगडू शकत नाही. त्यांचा त्यात आपण पाहिला असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेबांना जे हिंदुत्व अभिप्रेत होते, ते हिंदुत्व त्यांनी तळागळात पोहोचवले आणि त्याची पोचपावती जनतेने दिल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अखेरीस सांगितले.
पोटात तेच ओठात
- दीड महिन्यापूर्वी आम्ही कठीण अशी लढाई लढलो, ती लढाई साधी नव्हती. त्यावेळेस हितचिंतक आणि राजकारणातील मित्रांना धास्ती वाटली.
- अखेर लढाई आम्ही जिंकलो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. माझ्या गुरूच्या आशीर्वादाने मी हा पल्ला गाठला.
- या सरकारने दीड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आपल्या पोटात जे आहे तेच ओठात असल्याचेही शिंदे म्हणाले.