शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 09:19 AM2022-12-25T09:19:36+5:302022-12-25T09:20:07+5:30

पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर मी कायदेशीर त्याला उत्तर देईन. मी दोन पिढ्यांचा शिवसैनिक आहे असं आनंद परांजपे यांनी म्हटलं.

The new Shiv Sainiks should not teach me what Shiv Sena is; Anand Paranjape target shinde group | शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला

शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला

googlenewsNext

ठाणे - राष्ट्रवादी गटनेते जयंत पाटील यांचं गुरुवारी विधानसभेत अधिवेशन कालावधीपुरतं निलंबन करण्यात आले. जयंत पाटलांवरील या कारवाईविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन करत सरकारचा निषेध केला. त्यात ठाण्यात झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जिल्ह्यात पोलीस तक्रारी दिल्या जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला आनंद परांजपे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

आनंद परांजपे म्हणाले की, गुरुवारी संध्याकाळी जयंत पाटील यांचे निलंबन विधानसभेत करण्यात आले त्याविरोधात ठाण्यात आंदोलन करण्यात आले. त्यात मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मीदेखील लोकसभेचा खासदार राहिलो आहे. आंदोलनात वापरलेले शब्द जातीजातीत तेढ निर्माण करणारे, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे अथवा कुणाचाही अपमान करणारे असे नव्हते. ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गुन्हे नोंद करण्याचं काम सुरू आहे. त्याचं स्वागत करतो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर मी कायदेशीर त्याला उत्तर देईन. मी दोन पिढ्यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार आहेत. ८६ सालापासून मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. तेव्हा यांचा जन्मही झाला नसेल. त्यावेळी माझे वडील प्रकाश परांजपे नगरसेवक होते. शिवसेना काय हे मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी मला शिकवू नये. मी घाबरणार नाही. मी लोकशाहीत विचारांची लढाई, राजकीय लढाई लढत राहणार असा निर्धारही आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे. 

काय आहे प्रकरण?
जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली. "तख्त बदल दो, ताज बदल दो ; गद्दारो  का राज बदल दो, निर्लज्ज सरकारचा निषेध असो, ईडी सरकार मुर्दाबाद, पन्नास खोके -एकदम ओके, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा निषेध असो" अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली त्याविरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने सगळीकडे आनंद परांजपे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. 
 

Read in English

Web Title: The new Shiv Sainiks should not teach me what Shiv Sena is; Anand Paranjape target shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.