ठाणेकरांनी वैचारिकतेचा टेंभा का बरे मिरवावा?
By संदीप प्रधान | Published: December 4, 2023 09:24 AM2023-12-04T09:24:58+5:302023-12-04T09:25:24+5:30
ठाणे जिल्ह्यातील १११ ग्रंथालयांपैकी सहा ग्रंथालयांचे अनुदान शासनाकडून अलीकडेच बंद करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर वगैरे शहरांमध्ये सांस्कृतिक व वैचारिक चळवळी चालतात, याचा टेंभा मिरवणे चुकीचे आहे. कारण, सुमारे ८० लाख ते एक कोटी लोकसंख्येच्या या जिल्ह्यात एकूण ९७ ग्रंथालये असून, सभासद संख्या जेमतेम ३४ हजार ९८२ आहे. कोरोना काळात ग्रंथालयांच्या सभासद संख्येत झालेली घसरण सावरली नाही. ठाण्यातील लोकांनी मॉल्स, मल्टिप्लेक्सला जाणे, मंदिर-मदिरालयात जाणे टाकळे नाही. परंतु, वाचनालयाकडे पाठ फिरवली ती फिरवलीच. वैचारिकतेशी जर ठाणेकरांचे नाते घटले असेल तर आपण उगाच टेंभा का मिरवायचा?
ठाणे जिल्ह्यातील १११ ग्रंथालयांपैकी सहा ग्रंथालयांचे अनुदान शासनाकडून अलीकडेच बंद करण्यात आले. त्यापैकी चार ग्रंथालयांची मान्यता काढण्यात आली. दोन ग्रंथालयांना अकार्यक्षम ठरवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रंथालयांची संख्या ९७ झाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे वाचनालय अकार्यक्षम ठरले. ही मोठी नामुश्कीची बाब आहे. शासनाला अहवाल पाठवले नाही, आवश्यक उपक्रम राबवले नाही या कारणास्तव ही ग्रंथालये अकार्यक्षम ठरवली गेली. महापालिका व नगरपालिका रस्ते दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन वगैरे कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामातील अनियमितता उघड होते. मात्र, आपली ग्रंथालये अकार्यक्षम ठरणार नाही, याची काळजी या संस्था घेऊ शकत नाही, हे दुर्दैवी आहे.
ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये मिळून १२ लाख ६५ हजार २१२ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, ग्रंथालयांच्या सभासदांची संख्या केवळ ३४ हजार ९८२ आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या पाहता ग्रंथालयांत जाऊन नियमित पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या एवढी कमी असणे शोभनीय नाही. याचा अर्थ एकतर बहुतांश ग्रंथालयांमध्ये नव्या लेखकांची नवी पुस्तके उपलब्ध होत नाहीत. जुन्या लेखकांची तीच ती पुस्तके वाचून
कंटाळल्याने लोकांनी ग्रंथालयांकडे पाठ फिरवली. ग्रंथालये काळानुरूप कात टाकत नसल्याने हे घडले किंवा जिल्ह्यातील लक्षावधी वाचक संगणकावर पुस्तके वाचणे पसंत करतात, असा आहे. रेल्वे किंवा मेट्रोतून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे आपल्याला मोबाइलमध्ये वेबसिरीज, इन्स्टाग्रामवरील रील्स, यू ट्यूबचे व्हिडीओ पाहताना दिसतात.
पुस्तक वाचत प्रवास करणारे प्रवासी दुर्मीळ झाले आहेत. एखाद्या चांगल्या गाजलेल्या पुस्तकावरील वेबसिरीज पाहणे लोक पसंत करतात. मात्र, ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक वाचण्याकडील कल कमी झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण व काही चोखंदळ लेखक, वाचक सोडले तर पुस्तक हातात घेऊन बैठक मारून तासनतास वाचन करण्याची सवय व सहनशीलता अनेकांनी गमावली आहे. व्हॉट्सॲपवर प्रदीर्घ पोस्ट पाहिल्यावर अनेकजण फार पुढे न वाचता त्याचे स्वागत किंवा निषेध करून पुढे जातात. माहितीच्या महापुराने वाचकांची घुसमट सुरू आहे.
एखादे पुस्तक वाचल्यावर त्यामधील व्यक्तिरेखा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मनात रंगवतो. मात्र, आता वाचक या नात्याने हॅरी पॉटरची व्यक्तिरेखा आपापल्या पद्धतीने मनात रंगवण्यात रस नाही. पडद्यावरील हॅरी पॉटर हाच प्रत्यक्षातील हॅरी पॉटर म्हणून स्वीकारण्याचा पर्याय बहुतांशांनी स्वीकारला आहे.