ठाण्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या वाढतेय
By अजित मांडके | Published: July 11, 2024 03:12 PM2024-07-11T15:12:32+5:302024-07-11T15:12:59+5:30
पावसाळा सुरु होताच आरोग्य यंत्रणा देखील साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु असे असले तरी देखील जुन आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लु आणि डायरेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.
ठाणे : पावसाळा सुरु झाला आणि ठाण्यात साथरोगाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागल्याचे चित्र आहे. त्यातही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकेडवारीवरुनच स्पष्ट होत आहे. तसेच डायरेरीया आणि लेप्टोच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. ठाण्यात जुलै महिन्यात स्वाईन फ्लुचे तब्बल ७० रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर डायरेरीयाचे याच महिन्यात ११७ रुग्ण आढळून आले आहेत. त्या खालोखाल लेप्टोचे २० रुग्ण आढळले आहेत. याशिवाय शहरात मलेरिया आणि डेंग्युच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यु, मलेरियाचे रुग्ण कमी आढळून आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
पावसाळा सुरु होताच आरोग्य यंत्रणा देखील साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु असे असले तरी देखील जुन आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लु आणि डायरेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य केंद्राच्या मार्फत खरबरदारी घेतली असली तरी देखील आता प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्दी, ताप, खोकला आदीच्या रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या छपत्रती शिवाजी महाराज रुग्णालयात देखील याच आजाराचे रुग्ण अधिक संख्येने वाढत असल्याचे दिसत आहे.
स्वाईन फ्लुच्या रुग्णात वाढ
ठाणे महापालिका हद्दीत सध्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जुलै महिन्यात १० दिवसातच रुग्णांची संख्या ७० च्या पार गेली आहे. तर जुन महिन्यात ८ रुग्ण आढळले होते. तर जानेवारी ते जुलै या कालावधीत या रुग्णांची संख्या ११५ एवढी आढळून आली आहे. सुदैवाने यात कोणचाही मृत्यु झाला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मागील वर्षभरात या आजाराचे २५६ रुग्ण आढळून आले होते. तर संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत ही संख्या ८७ एवढी होती. परंतु यंदा मात्र अवघ्या १० दिवसात रुग्णांची संख्या ७० पार गेली आहे.
डायरेरियाच्या रुग्णही वाढले
महापालिका हद्दीत जानेवारी ते जुलै या कालावधीत ८८६ रुग्ण आढळून आले आहे. जुलैच्या पहिल्या १० दिवसात ११७ तर जून महिन्यात २१२ रुग्ण आढळून आले आहेत. तर प्रत्येक महिन्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.
लेप्टाचे २० रुग्ण
लेप्टोच्या आजाराने देखील महापालिका हद्दीत दस्तक दिली असून मागील १० दिवसात लेप्टोचे २० रुग्ण आढळून आले आहेत. तर जानेवारी ते जुलै या कालावधीत ही संख्या २७ एवढी असून पाच महिन्यात ०७ रुग्ण तर जुलैच्या अवघ्या १० दिवसात २० रुग्ण आढळले आहेत.
मलेरिया, डेंग्युच्या रुग्णांची संख्या घटली
मागील वर्षीच्या तुलनेत सध्या तरी मलेरिया आणि डेंग्युच्या रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र आहे. जुलैच्या १० दिवसात मलेरियाचे ११ तर डेंग्युचे संशयीत १५ आणि लागण झालेले ३ असे १८ रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारी ते जुलै या कालावधीत मलेरियाचे ११८ तर डेंग्युचे संशयीत ९६ तर लागण झालेले ४४ असे १३६ रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी डेंग्युचे वर्षभरात ५५६ रुग्ण आढळले होते. तर ०३ जणांचा मृत्यु झाला होता. तर मलेरियाचे ८९३ रुग्ण आढळून आले होते.
आजार
जानेवारी ते जुलै
१) स्वाईन फ्लु - ११५
२) डायरेरिया - ८८६
३)लेप्टो - २७
४) मलेरिया - ११८
५) डेंग्यु - १३६