रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीमध्ये पडूनही प्रवासी बचावला
By जितेंद्र कालेकर | Published: January 9, 2023 08:59 PM2023-01-09T20:59:57+5:302023-01-09T21:00:02+5:30
ठाणे रेल्वे स्थानकातील घटना: साखळी खेचत टीसीने दाखविले प्रसंगावधान
ठाणे: कोणार्क एक्सप्रेसमध्ये चढताना झाडखंडच्या रामजीवन श्यामदेव माझी (३८) हे प्रवासी अगदी थोडक्यात बचावल्याची घटना सोमवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. रेल्वे आणि फलाट या दोघांच्या पोकळीमध्ये राहिल्याने तसेच वेळीच तिकीट तपासणीसाने प्रसंगावधान दाखवित साखळी खेचल्याने रामजीवन हे बचावले आहेत. त्यांच्या कमरेला खरचटल्याने दुखापत झाली आहे.
रामजीवन हे ठाण्यातून कामासाठी पुण्याला निघाले होते. यासाठी ते दुपारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवर कोणार्क एक्स्प्रेसची वाट पाहत होते. रेल्वे आल्यावर अचानक आत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. त्यामध्ये ते चढण्यापूर्वीच रेल्वेने फलाट सोडले. त्यामुळे त्यांनी धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो प्रयत्न असफल ठरला आणि ते रेल्वे आणि फलाट यांच्या पोकळीमध्ये पडले. पडल्यानंतर सुदैवाने ते फलाटाला खेटून झोपून राहीले.
याचदरम्यान टीसी मनोजकुमार यांनी ट्रेनची साखळी खेचल्यावर दोन मिनिटांनंतर काही अंतरावर जाऊन ही रेल्वे थांबली. यावेळी फलाटावर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस कर्मचारी विक्की आणि अमित कुमार यांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले. तसेच तातडीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी फलाट क्रमांक दोनवरील वन रुपी क्लीनिकमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्याची माहिती ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस उपनिरीक्षक प्रियंका सिंग यांनी दिली.