दिघे यांचा वारसा कोण पुढे नेणार, ते जनताच ठरवेल; राजन विचारे यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 05:52 AM2022-08-27T05:52:19+5:302022-08-27T05:53:29+5:30
आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील.
ठाणे :
आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेतो हे आगामी निवडणुकीत जनताच दाखवेल, अशी टीका शिवसेना खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली.
स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खारकर आळीतील शक्तिस्थळावर दिघे यांना अभिवादन करण्यासाठी खासदार राजन विचारे तसेच स्व. दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि महिला आघाडीच्या अनिता बिर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
विचारे यांचा व्हिडीओ व्हायरल
जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात ते झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरे, ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला, असा संदेश विचारे यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे दिला.
ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने
स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आनंद आश्रमात ठाकरे गट विरुद्ध शिदे गट हे आमने सामने आल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री शिंदे हे आनंद आश्रमात येणार म्हणून त्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आदींसह
इतर पदाधिकारी उपस्थित होते. परंतु त्याच वेळेस शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि इतर पदाधिकारी हजर झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्री शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पकड आहे. शुक्रवारी शक्तिस्थळावर ठाकरे गटाच्या माध्यमातून खा. विचारे यांनी शिंदे यांना आव्हान दिले.
दिघे यांच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मोठ्या पदापर्यंत पोहोचला. दिघे हे शिवसेना या चार अक्षरांसाठी शेवटपर्यंत जगले, असे सांगत विचारे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्यावर टीका केली. कोण कोणाच्या हृदयात आहे हे येत्या निवडणुकीत जनताच दाखवेल, असेही ते म्हणाले.