पाच लाखांची वीज चोरी करणाऱ्याला अटक
By कुमार बडदे | Published: May 18, 2023 09:35 PM2023-05-18T21:35:32+5:302023-05-18T21:35:42+5:30
१ जूनपर्यंत सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी
कुमार बडदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः वीज बिल न भरता चोरून वीज वापरल्याप्रकरणी मुंब्रा-कौसा येथे राहत असलेल्या तन्वीर चौगुले या इसमास मुंब्रा पोलिसानी वीज चोरीप्रकरणी अटक केली आहे. त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता १ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
कौसा येथील डोंगरे नगर परिसरात राहत असलेला चौगुले महावितरणच्या काळापासून वीज बिलाचा भऱणा करत नव्हता. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांच्या वीज बिल थकबाकीमुळे त्याचे वीज मीटर वीज वितरण करत असलेल्या टोरंट पॉवर कंपनीने काढले होते. मात्र त्यानंतरही तो चोरून वीज वापरत होता.. वीज बिल भरणा न केल्याने त्यांच्या घरचा वीज प्रवाह खंडीत झाला होता मात्र तरीही चोरून त्यानी अनेकदा वीज जोडणी करून घेतली. त्याच्या दोन फ्लॅटमधील वीज बिल २.लाख ९६ हजार रुपये असून,एकूण वीज चोरीचे मूल्यांकन केले असता ५ लाखावर पोचले होते. वारंवार सूचना देऊनही वीज चोरी करणे त्याने थांबवले नव्हते. त्याच्यावर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली.यापुढेही वीज चोरी करणा-या विरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा कंपनीने दिला आहे.