उल्हासनगरात पार्सल देण्याच्या बहाण्याने वृद्धेला घरात घुसून लुटले
By सदानंद नाईक | Published: March 5, 2023 07:21 PM2023-03-05T19:21:05+5:302023-03-05T19:21:53+5:30
घरात एकटीच असलेल्या वृद्धेला पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसून लुटल्याचा प्रकार घडला आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर: घरात एकटीच असलेल्या वृद्धेला पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसून लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी १२ तासाच्या आत चोरट्यांना अटक करून गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-३, राधाबाई चौक येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ६५ वर्षीय माया हिरानंद लालवानी ह्या पतीसह राहतात. शनिवारी सायंकाळी पती घराबाहेर गेल्याने, त्या घरात एकट्याच होत्या. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दोन तरुण घरी येऊन पार्सल आल्याचे सांगून घरात प्रवेश केला. माया लालवानी याना धक्काबुक्की करून ओरडणार या भीतीतून तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर कानातील कर्णफुले व हातातील सोन्याच्या बांगड्या असा दिड लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला. दरम्यान हिरानंद लालवानी घरी आल्यावर, चोरीचा प्रकार उघड झाला. त्यांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती दिल्यावर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घरा शेजारील सीसीटीव्ही फुटेज तपासून १२ तासात मुकेश गोवर्धन खुपचंदानी व आनंद मंडल यांना अटक केली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. दोन्ही आरोपीची पाश्वभूमी गुन्हेगारीची असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकारने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकट्या राहणाऱ्या वृद्ध नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"