कृषी खात्याचे प्रधान सचिव रमले शेतीत, शहापूरमध्ये पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला कानमंत्र
By सुरेश लोखंडे | Published: October 2, 2022 06:39 PM2022-10-02T18:39:08+5:302022-10-02T18:39:22+5:30
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील माळ, विहिगावातील शेतकऱ्यांसोबत कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले व सहसंचालक अंकुश माने आदी अधिकारी शनिवारी पूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसाेबत राहिले.
ठाणे :
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील माळ, विहिगावातील शेतकऱ्यांसोबत कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले व सहसंचालक अंकुश माने आदी अधिकारी शनिवारी पूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसाेबत राहिले. त्यांनी शेतातील भात, नागली, वरी आदी पिकांसह मोगरा या फूलशेतीची आणि फळबाग लागवडीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभाचे धडेही दिले.
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी शेतीची पाहणी केली. शेतातील पिकांची आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या माहिती दिली. या पाहणी दौऱ्यात डवले यांनी शेतकऱ्यांसाेबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत माने यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे आदींनी शेतकऱ्यांशी शेती तंत्रज्ञानासह जैविक शेती व वेगवेगळे खत वापरण्याचे फायदे व मशागतीचे महत्त्व आदी विषयांवर चर्चा केली.
या आदिवासी व डोंगराळ भागातील शिवारात फिरताना अधिकाऱ्यांनी सुनील निरगुडा यांच्या शेततळ्याची आणि काजू, आंबा आणि व मोगरा लागवडीची पाहणी केली. तर माळ गावामधील बुध्या बंगारा यांच्या शेतातील नाचणी व वरईच्या डाेलणाऱ्या पिकांनाही भेट दिली. तसेच महिला शेतकरी राजश्री भस्मे यांच्या शेतातील मोगरा लागवडीची तर विहिगावचे शेतकरी बुध्या भला यांच्या भातपिकाची पाहणी करून त्यांनी पिकांची निगा राखण्याचे सूत्र सांगितल्याची माहिती कुटे यांनी ‘लोकमत’ला दिली.