प्रोजेक्ट आत्मनिर्भर क्रांतीकारी ठरणार - संदीप माळवी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: June 27, 2024 02:24 PM2024-06-27T14:24:56+5:302024-06-27T14:25:09+5:30

अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या छत्र्यांची विक्री सुरु 

The project will be self-sustainable revolutionary - Sandeep Malvi | प्रोजेक्ट आत्मनिर्भर क्रांतीकारी ठरणार - संदीप माळवी

प्रोजेक्ट आत्मनिर्भर क्रांतीकारी ठरणार - संदीप माळवी

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे - रस्त्यावर निर्वासितांसारखे जगणाऱ्या समूहाला प्रतिष्ठा देण्याचे काम प्रोजेक्ट आत्मनिर्भरच्या माध्यमातून होईल. सिग्नल शाळेचे हे पाऊल भविष्यात क्रांतिकारी ठरणार, असा आत्मविश्वास ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी येथे व्यक्त केला.

समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल. प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी यावेळी केले. जिल्हा न्यायाधीश सोनल शहा, ऍड. ईश्वर सूर्यवंशी,  ऍड. प्रदीप टिल्लू, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ठाण्यातील विविध सिग्नलवर वस्तू विकून चरितार्थ चलविणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड इंटरप्राइजेसच्या अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचसोबत विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेसकोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागरिकांनी अशा कुटुंबांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील करण्यात येत आहे. अशा प्रयत्नांमुळे पालकांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा निर्वासितपणा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यातील छत्र्यांसोबतच वर्षभर विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ही उत्पादने विकत घ्यावीत असे आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे. ही उत्पादने सिग्नल शाळा व तीन हात नका सिग्नल येथे उपलब्ध असतील.

Web Title: The project will be self-sustainable revolutionary - Sandeep Malvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे