महापालिकेचा मालमत्ता कर विभाग लागला नव्या आर्थिक वर्षात कामाला

By अजित मांडके | Published: April 3, 2023 04:29 PM2023-04-03T16:29:45+5:302023-04-03T16:30:11+5:30

पहिल्या तीन दिवसात ६ कोटींचा भरणा

The Property Tax Department of the thane Municipal Corporation has started work in the new financial year | महापालिकेचा मालमत्ता कर विभाग लागला नव्या आर्थिक वर्षात कामाला

महापालिकेचा मालमत्ता कर विभाग लागला नव्या आर्थिक वर्षात कामाला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मार्च अखेर तब्बल ७२२ कोटींची विक्रमी वसुली केली आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरु होत नाही तोच या विभागाने १ एप्रिल पासून वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ठाणेकरांच्या मोबाइल पहाटे पाच वाजल्यापासून मेसेज धडकले. नागरीकांनी देखील महापालिकेच्या या मेसेजची दखल घेत, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ९३ लाखांचा  भरणा करीत याला प्रतिसाद दिला. तर पहिल्या तीन दिवसात तब्बल ६ कोटींचा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे. अनेकांना मोबाइलवर तर काहींनी थेट त्यांच्या मेलवरच मालमत्ता कराची पावती पाठविण्यात आल्याने आता या विभागाने पेपरलेस कारभाराकडे पाऊल टाकल्याचे दिसून आले.

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा विक्रमी वसुली केली आहे. ३१ मार्च अखेर महापालिकेच्या तिजोरीत ७२२ कोटी ११ लाखांची वसुली झाली आहे. यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील सर्वाधिक २३२.५९ कोटींची वसुली झाली आहे. त्या खालोखाल मुख्यालयाचा ९७.३३ भरणा झाला आहे. त्यातही महापालिकेने मागील वर्षापासून आॅनलाईन बील भरणा करण्यासाठी विविध प्रयोग हाती घेतले होते. त्याला नागरीकांना प्रतिसाद देत, मालमत्ता कराचा भरणा केला. यात रोख स्वरुपात ९३.९२ कोटी, चेक - ३५६.१९ कोटी, डीडी - १०३.०१ कोटी, आॅनलाईन १६६.९५ कोटी आणि कार्डद्वारे २.०४ कोटींचा भरणा झाल्याचे दिसून आले आहे.

आता नव्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आपला कारभार पेपरलेस करण्यासाठी पावले उचलली आहे. त्यानुसार सरते आर्थिक वर्ष संपत नाही तोच १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ठाणेकर नागरीकांच्या मोबाइल महापालिकेचे मेसेज धडकले. त्यात चालू वर्षाचे बील त्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार आता पर्यंत १ लाख २५ हजार ठाणेकरांना हे मेसेज आतापर्यंत गेले आहेत. तर अनेकांच्या मेलवरच थेट बील पाठविण्यात आले आहे. महापालिकेच्या या आॅनलाईन आवाहनाला प्रतिसाद देत १ एप्रिल रोजी १.९३ कोटी, २ एप्रिल रोजी ३.०१ कोटी आणि ३ एप्रिल रोजी जवळ जवळ अडीच कोटींचा भरणा नागरीकांनी केला आहे. यापूर्वी ठाणेकरांना मे अखेर पर्यंत घरपोच बिले दिली जात होती. परंतु आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेने या आॅनलाईन पध्दतीचा अवलंब केल्याने महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कर विभागाला पहिल्याच दिवशी वसुली करता आलेली आहे.

२०२२-२३ मध्ये विक्रमी वसुली
२०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने तब्बल ७२२ कोटींची वसुली केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३० कोटींची अधिक वसुली झाल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी वसुली ही ५ टक्यांने वाढल्याचे दिसत असते. मात्र यंदा हीच वसुली २२ टक्के अधिक दिसून आली.

तासनतास रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार
महापालिकेने आॅनलाईन कर भरण्यासाठी नागरीकांना जी पे, फोन पे आदींसह इतर पर्यांयाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार ज्या नागरीकांना आता फोनवर किंवा मेलवर बिले गेली आहेत, त्या बिलांवरच कशा पध्दतीने कराचा भरणा करता येऊ शकतो. याची माहिती देण्यात आलेली आहे.

Web Title: The Property Tax Department of the thane Municipal Corporation has started work in the new financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.