कांदळवन क्षेत्रात बेकायदा भराव करून बांधकाम केल्या प्रकरणी महसूल विभागाने दाखल केले दोन गुन्हे
By धीरज परब | Published: June 9, 2024 11:59 PM2024-06-09T23:59:17+5:302024-06-09T23:59:27+5:30
दुरुस्ती परवानगीच्या आड बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीत वरसावे व घोडबंदर ह्या दोन ठिकाणी कांदळवन क्षेत्रात बेकायदा भरीव करून बांधकाम केल्या प्रकरणी महसूल विभागाने काशिगाव पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत . तर वरसावे येथे कांदळवन ऱ्हासाचे गुन्हे दाखल असताना दुरुस्ती परवानगी देणारे आणि त्या आड झालेल्या बेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करा अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे .
राष्ट्रीय महामार्ग लगत वरसावे येथील सर्व्हे क्रं. २३ हिस्सा क्रं. १ मध्ये दरे पटेल कंपाउंड आहे . ह्या ठिकाणी कांदळवन तोडल्या बद्दल महापालिकेनेच गुन्हे दाखल केले होते . तसे असताना पालिकेचे तत्कालीन प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी दुरुस्ती परवानगी दिली . दुरुस्ती परवानगी आड भलेमोठे नवीन बेकायदा बांधकाम करून मेट्रो द रॉयल नावाने हॉटेल थाटण्यात आले . सदर बेकायदा बांधकामास पालिकेने सातत्याने संरक्षण दिले .
या प्रकरणी अपर तहसीलदार यांच्या आदेशा वरून तलाठी अभिजित बोडके यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात कांदळवन नष्ट करून त्यात बेकायदा भराव व बांधकाम केल्या बद्दल गुन्हा दाखल केला आहे . तर या प्रकरणी पालिकेचे स्वप्नील सावंत सह संबंधित अधिकारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे .
दुसरीकडे हाटकेश - घोडबंदर मार्गावर असलेल्या मौजे घोडबंदर सर्व्हे क्रं. ३९ व ४० पैकीच्या काही क्षेत्रात इंद्रजित टाटा मोटर्स चे बेकायदा शेड आणि बांधकाम आहे . सदर क्षेत्र कांदळवन पासून ५० मीटर बफर झोन मध्ये तसेच खाडी जवळ केले असल्याने त्याची तक्रार केली गेली होती .याप्रकरणी कांदळवन समितीची स्थळपाहणी होऊन काशिगाव पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार तलाठी बोडके यांनी गुन्हा दाखल केला आहे.
ह्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत . तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून झालेल्या बेकायदा भराव आणि बांधकामावर महापालिका कधी कारवाई करणार ? असा प्रश्न देखील पर्यावरण प्रेमींनी केला आहे .