पोलिसांची भूमिका ठरणार मनसेच्या भोंग्याच्या ‘आवाजा’वर; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 10:30 AM2022-04-15T10:30:15+5:302022-04-15T10:30:24+5:30
ठाणे : मशिदींवरील भाेंगे उतरवले नाहीत, तर हनुमान चालिसा लावू, असा इशारा देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्ह्यात किती ...
ठाणे : मशिदींवरील भाेंगे उतरवले नाहीत, तर हनुमान चालिसा लावू, असा इशारा देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्ह्यात किती आक्रमक भूमिका घेते, किती ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळतो, हे पाहून दि. ३ मेनंतर मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेण्याचे पोलीस प्रशासनाने ठरवले आहे. अर्थात राज्य शासनाने तत्पूर्वीच सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भोंगे उतरविण्याची भूमिका घेतली, तर पोलिसांना मशिदींवरील भोंगे उतरविण्यास भाग पाडावे लागेल.
मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत न उतरवल्यास मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजविण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेमुळे पोलीस यंत्रणेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४१७ मशिदी असून, कायदा आणि सुव्यवस्था राखायचे सोडून आम्ही भोंग्यांचे संरक्षण करावे का, असा प्रश्न उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मुस्लीम धर्मियांमध्ये नमाज अदा करण्याची अर्थात प्रार्थना करण्याची वेळ निश्चित नसते. ती सूर्याची दिशा आणि स्थानानुसार दररोज बदलते. त्यामुळे एकाचवेळी सर्वांना ही वेळ समजावी, यासाठी भोंग्याचा वापर केला जातो, असे या धर्मातील जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, ध्वनी प्रदूषणाचे नियम सर्वांसाठीच सारखे आहेत. यातून कोणत्याही धर्माला सूट दिलेली नाही. याशिवाय २००५ साली सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी आणली होती. हाच धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नेमके करावे तरी काय, हा प्रश्न यंत्रणेपुढे उभा आहे.
राज ठाकरे यांनी त्यांची उत्तरसभा ठाण्यातच घेतली होती. शिवाय ठाणे जिल्ह्यात मशिदींचे जाळेही मोठे आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४१७ मशिदी आहेत. सर्वाधिक ११३ मशिदी एकट्या मुस्लीमबहुल मुंब्रा परिसरात आहेत. त्याखालोखाल भिवंडी परिमंडळात १५५ मशिदी आहेत. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांना संरक्षण द्यावे की, ३ मेनंतर या मशिदींसमोर मनसेकडून हनुमान चालिसा वाजविण्यासाठी लावल्या जाणाऱ्या भोंग्यांना सांभाळावे, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा झाला आहे. ठाण्याचे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी याबाबत अधिकृतरित्या बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, ३ मे रोजी मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण रमजान ईद आहे. मनसेनेही नेमक्या त्याच दिवसापासून आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारचा कोणताही संघर्ष टाळण्यासाठी काय करता येईल, याची चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी खास करून पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे.
हाताची घडी, तोंडावर बोट
भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तूर्तास चुप्पी साधली आहे. हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे आधी शासन स्तरावर याबाबत काय तोडगा निघतो, हे आम्ही बघू. त्यानंतर शासन आदेश काय येतात, ते बघूनच आम्ही काय ते ठरवू, असे उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला खासगीत सांगितले.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील मशिदी
परिमंडळ मशिदी
ठाणे १७७
भिवंडी १५५
कल्याण ४५
उल्हासनगर २२
वागळे इस्टेट १८
एकूण ४१७