चिंचणीच्या सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडले; पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 08:47 PM2022-02-16T20:47:30+5:302022-02-16T20:48:26+5:30
पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पो नि. स्वपन बिश्वास ह्याच्या नेतृत्वाखाली टीमने अटक केली.
- हितेंन नाईक
पालघर: डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे अत्यंत वादग्रस्त ठरलेले आणि त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची सतत मागणी होत असलेल्या उच्चशिक्षित सरपंच कल्पेश धोडी याला आज बोईसरच्या एका हॉटेलात 20 हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
चिंचणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक नवीन चेहरा, सुशिक्षित उमेदवारांची आवश्यकता असल्याने शिवसेनेने मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या कल्पेश धोडी या तरुण उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले होते.परंतु अल्प कालावधीत अनधिकृत कामांना परवानगी, घरपट्टी घोटाळा, ग्रामपंचायत निधी गैरकारभार आदी आपल्या वादग्रस्त कारभाराने त्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले.
कल्पेश धोडीवर विरोधी पक्षांसह आपल्याच पक्षातील सदस्यांनी ही भ्रष्टाचाराचे आरोप करून त्याच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अविश्वास ठराव ही दाखल केले आहेत. मासिक सभा, ग्रामसभेत छुप्या पद्धतीने ठराव घेत बेकायदेशीर कामाला प्रोत्साहन देत असल्याचे अनेक आरोप त्याच्यावर करण्यात आले होते.
तक्रारदार मोहम्मद चुनावाला ह्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चिंचणी येथे खरेदी केलेल्या जमिनीवर बांधकाम करणे आणि त्यावर उभ्या असलेल्या स्मशानभूमी हटविण्यासाठी सरपंच धोडी यांनी १४ लाख ५० हजाराची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पहिल्या हफत्यामधील ४ लाख ५० बाजारातील २० हजाराची रक्कम बोईसरमधील मधुर हॉटेलमध्ये स्विकारताना सरपंच धोडी याला पालघरच्या लाचलुचपत विभागाने त्याला अटक केली. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पो नि. स्वपन बिश्वास ह्याच्या नेतृत्वाखाली टीमने अटक केली.