रोशनी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची शिंदे गटाची मागणी मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 06:03 AM2023-04-05T06:03:35+5:302023-04-05T06:04:08+5:30
ज्या महिलेला मारहाण तिच्यावरच गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राजन विचारे यांच्याऐवजी ठाण्यातून खासदारकीची उमेदवारी महाविकास आघाडीतील अन्य पक्षाला दिली जाणार असल्याने विचारे यांनीच कटकारस्थान करून रोशनी शिंदे यांच्या माध्यमातून फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या. गरोदर महिलेला मारहाण झाल्याचा बनाव केला. तो उघड झाल्यामुळे आता बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी केली. त्यानंतर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
ठाकरे गटाकडून रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर म्हस्के व मीनाक्षी शिंदे तसेच इतर महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.
ज्या महिलेला मारहाण तिच्यावरच गुन्हा
मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांच्याविरुद्ध दोन गटांत वितुष्ट निर्माण करणे, आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणे आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी कलम १५३-१ आणि कलम ५०० नुसार कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे; मात्र त्यांना झालेल्या मारहाणीची वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर पुराव्यांच्या आधारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी सांगितले.