अंबरनाथच्या पाणीटंचाईबाबत शिवसेनाही मैदानात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिलं निवेदन
By पंकज पाटील | Published: May 15, 2023 05:29 PM2023-05-15T17:29:08+5:302023-05-15T17:29:23+5:30
शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.
अंबरनाथ - अंबरनाथ शहराचा पश्चिम भाग गेल्या काही वर्षांपासून तहानलेला असून त्या भागाचा पाणीपुरवठा तर सुरळीत करा. पण पूर्ण शहराला जाणवणारी पाणीटंचाई त्वरित दूर करा अशी मागणी करत आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे.
अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जाणवणाऱ्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी या मागणीसाठी शहरप्रमुख वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर धडक देऊन पाणी टंचाईचा जाब विचारला. कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांची भेट घेऊन पाणीबाणी संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली.
अंबरनाथ शहरातील पाणी समस्येबाबत वारंवार सांगूनही ठोस कारवाई केली जात नाही, मोर्चे, आंदोलने, इशारे दिले की तेवढ्यापुरती त्या भागातील पाणी समस्या दूर केली जाते, आता उडवाउडवीची उत्तरे देऊ नका ती ऐकून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. पाणी पुरवठा कमी होत असून त्यामध्ये वाढ करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत. मात्र वाढीव पाणी देण्यास एमआयडिसीने नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिमेकडील बालाजी नगर , मुरलीधर मंदिर, खामकर वाडी, आदी भागात रात्री , मध्यरात्री अनियमित पाणी पुरवठा होतो.येत्या काही दिवसांत पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा यावेळी शहरप्रमुख वाळेकर यांनी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, तसेच राजेश शिर्के, संभाजी कळमकर, पद्माकर दिघे. मिलिंद गान, नरेश मोरे., संजय गावडे, किशोर सोरखाते, सुप्रिया मालुसरे आदींचा उपस्थित होते.