उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने काढला मशाल मोर्चा
By सदानंद नाईक | Published: October 22, 2022 05:35 PM2022-10-22T17:35:52+5:302022-10-22T17:36:29+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन येथून शुक्रवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाने मशाल मोर्चाचे आयोजन केले होते.
उल्हासनगर - पक्षाचे चिन्ह घराघरात जाण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने शुक्रवारी सायंकाळी मराठा सेक्शन ते कॅम्प नं-३ दरम्यान मशाल यात्रा काढली. पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह शेकडो जण मशाल मोर्चात सहभागी झाले होते.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन येथून शुक्रवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाने मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी केले. पक्षाला मिळालेले मशाल चिन्ह घराघरात पोहचण्यासाठी मशाल मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती बोडारे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी निघालेला मोर्चा मराठा सेक्शन, ओटी सेक्शन, श्रीराम चौक, पवई चौक, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन, शांतीनगर, महापालिका मार्गे मध्यवर्ती पोलीस ठाणे परिसरात दरम्यान काढण्यात आला. मोर्चात पक्षाचे पदाधिकारी, महिला व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मशाल यात्रेत ५० खोके, माजले बोके, गद्दार आदी घोषणा देण्यात आल्या असून घोषानेत अपशब्द काढल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी एका गटाकडून होत आहे.
मोर्चात चंद्रकांत बोडारे यांच्यासह जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, शेखर यादव, संदीप गायकवाड, मनीषा राजपूत, शिवाजी जावळे आदीजन उपस्थित होते. मोर्चात नागरिकांनीही भाग घेतल्याने, शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.