बदलापूर: न्यायालयाकडून कानउघाडणी; SITने आता दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 07:30 AM2024-08-29T07:30:39+5:302024-08-29T07:31:03+5:30
बदलापूर प्रकरण : आधी दाखल हाेता एकच गुन्हा.
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. या आधी शोषण झालेल्या दोन्ही मुलींकरिता एकच गुन्हा नोंदवला होता. मात्र, न्यायालयाने कानउघाडणी केल्यावर एसआयटीने आता दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी शिंदे याची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाले होते. पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात एकच गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या या भूमिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यामुळे आता एसआयटीच्या सल्ल्यानुसार, दुसऱ्या पीडित मुलीच्या बाबत घडलेल्या गुन्ह्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी शिंदे हा न्यायालयीन कोठडीत असून, आता दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे पुन्हा त्याला पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
...त्याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवला नव्हता
ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळेतील एका पालकाला आपली मुलगी शाळेत जाण्यास घाबरत असल्यामुळे संशय आला होता. त्यांच्या मुलीबाबत काहीतरी चुकीचे घडले आहे याची कल्पना त्यांना आली होती. संबंधित पालकांनी दुसऱ्या विद्यार्थिनीच्या आजोबांना त्याची कल्पना दिली. त्यामुळे आजोबांनीही आपल्या नातीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यासोबत अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर दुसऱ्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात ज्या चिमुकलीवर सर्वप्रथम अत्याचार झाले त्याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदवला नव्हता. आता एसआयटीने दोन्ही अत्याचाराच्या घटनेचे स्वतंत्र गुन्हे नोंदवले.