थप्पड कनिष्ठ अभियंत्याला वळ उठले सहायक आयुक्तांवर
By धीरज परब | Published: June 27, 2023 10:52 PM2023-06-27T22:52:50+5:302023-06-27T22:53:39+5:30
शासनाने ठाण्यात बदली करून देखील तब्बल एकवर्ष मीरा भाईंदर न सोडणाऱ्या सहायक आयुक्तची अखेर उचलबांगडी
मीरारोड - आमदार गीता जैन यांनी ठेक्यावरील कनिष्ठ अभियंत्यास लागवलेल्या थप्पडचे वळ त्या भागातील प्रभाग अधिकारी असलेल्या सचिन बच्छाव यांच्यावर उठले आहेत . बच्छाव यांची शासनाने गेल्यावर्षी ठाणे महापालिकेत बदली केली असताना बच्छाव गेलेच नव्हते . आ . जैन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना भेटून तक्रार केल्यावर सूत्रे हल्ली आणि मंगळवारी बच्छाव हे मीरा भाईंदर महानगरपालिका सोडून ठाणे महापालिकेत हजर झाले
मीरारोडच्या पेणकरपाडा भागात पावसाळ्यात राहते घर तोडण्याची कारवाई प्रभाग अधिकारी बच्छाव यांनीच बिल्डरच्या तक्रारी वरून केली होती . २० जून रोजी आ . गीता जैन घटनास्थळी गेल्या असता बच्छाव मात्र गेले नव्हते . त्यांनी ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील व संजय सोनी यांना पाठवले होते .
आ . जैन यांनी शुभम यांना थप्पड लगावल्याच्या घटनेने खळबळ उडाली . मात्र त्यांचा खरा रोष हा बच्छाव यांच्यावर होता . आणि तश्या घडामोडी देखील बच्छाव यांच्या कडून घडल्याचे सांगितले जाते . वास्तविक शासनाने बच्छाव योनीची बदली ठाणे महापालिकेत २२ मे २०२२ रोजीच शासन आदेश काढून केली होती. मात्र त्या नंतर देखील बच्छाव हे मीरा भाईंदर महापालिका सोडत नव्हते .
थप्पड प्रकारा नंतर आक्रमक झालेल्या आ . जैन यांनी सोमवारी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना भेटून बच्छाव यांची तक्रार केली . शासन आदेशाचे उल्लंघन करून बदलीच्या ठिकाणी तब्बल एक वर्ष पेक्षा जास्त काळ होऊन देखील हजर न झालेल्या बच्छाव यांना निलंबित करा आणि विभागीय चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली . मुख्य सचिवांनी देखील सदर बाब गंभीर असल्याने तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले . त्यानंतर बच्छाव यांनी मीरा भाईंदर महापालिका सोडत ठाणे पालिकेत मंगळवारी रुजू झाले .