गोवर सर्व्हे पथकाला सोसायटीचा दम, दरवाजा लावल्याने कर्मचाऱ्याची बोटे अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:11 AM2022-11-29T10:11:01+5:302022-11-29T10:11:25+5:30
गोवर रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्रा आणि आसपासच्या परिसरात गोवराचे रुग्ण शोधण्यासाठी फिरणाऱ्या पथकाच्या अंगावर अख्ख्या सोसायटीने धावून जाण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी पथकाच्या तोंडावर दरवाजा बंद करण्यात आला. एका ठिकाणी दरवाजात पथकातील एका कर्मचाऱ्याची बोटे अडकली. असे प्रकार घडत असल्याने सर्वेक्षणासाठी जायचे कसे असा प्रश्न पालिकेच्या पथकाला पडला आहे. घाबरून काही कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाला जाण्यास विरोधही सुरू केल्याचे समजते.
गोवर रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे. मात्र, मुंब्य्रात सर्व्हे करण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत आहेत. अमृतनगर भागात सर्व्हेसाठी गेलेल्या पथकाला इमारतीमधील सर्व रहिवासी मारहाण करण्यासाठी धावून आल्याने गंभीर प्रसंग निर्माण झाला होता. काही कुटुंबांनी घरात असतांनाही बाहेरून कुलूप लावून घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या. घरातच लपून बसण्याचे प्रमाण या भागात अधिक असल्याचे सर्व्हेत दिसून आले. लसीकरण आज नको उद्या या, असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला कुलूपलावून बाहेर निघून जाण्याचे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्व्हे कसा करायचा आणि नंतर लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न महापालिकेच्या पथकांना पडला आहे. यामुळे पालिका पथकाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी होत आहे.
शाळा व्यवस्थापनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला ताप आला असेल तर शिक्षकांनी त्याला लागलीच घरी पाठविणे गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले.
लसीकरणाबाबत चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
गोवराचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. तसेच सर्व्हेवर भर दिला आहे. सर्व्हेसाठी १६० पथके तयार केली आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील सर्व्हे झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हे सुरू आहे. तो पूर्ण झाल्यावर पुन्हा सर्व्हेचे काम तिसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहे. गोवराची साखळी रोखणे त्यामुळे शक्य होणार आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त, ठामपा