भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातील गैरसोयींची राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली दखल
By धीरज परब | Published: February 16, 2023 08:17 PM2023-02-16T20:17:46+5:302023-02-16T20:17:55+5:30
शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात अवास्तव पैसे मोजून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.
मीरारोड - भाईंदर मधील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयातील गैरसोयी , अपुरे मनुष्यबळ व रुग्णांची होणारी हेळसांड याची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने शासनासह ठाणे जिल्हाधिकारी व मीरा भाईंदर महापालिकेस नोटीस बजावून २ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
न्यायालयाच्या तंबी नंतर मीरा भाईंदर महापालिकेने भाईंदर पश्चिम येथे पंडित भीमसेन जोशी हे २०० खाटांचे ४ मजली रुग्णालय बांधले . परंतु रुग्णालय बांधून देखील अत्यावश्यक उपचार - शस्त्रक्रिया होत नव्हत्या . त्यामुळे रुग्णालय ऐवजी दवाखाना म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली . रुग्णालय चालवणे खर्चिक असल्याचे सांगून तत्कालीन नगरसेवक व आमदार आदींसह पालिका प्रशासनाने देखील पालिकेचे हे रुग्णालय शासनाच्या हवाली केले . परंतु शासना कडे रुग्णालय जाऊन सुद्धा अत्यावश्यक शास्त्क्रिया व उपचार व सुविधा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत . त्यातच अपुरे डॉक्टर व मनुष्यबळ आणि त्यांना देखील पगार वेळेवर मिळत नसल्याने एकूणच रुग्णालयाची आरोग्यसेवा कोलमडलेली आहे .
शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात अवास्तव पैसे मोजून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. याची राज्याच्या मानवी हक्क आयोगाने दखल घेत स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव, महापालिका आयुक्त व ठाणे जिल्हाधिकारी यांना समन्स बजावले आहेत . २ मार्च पूर्वी रुग्णालया बाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत .