गुजरातमध्ये चाललेला पंजाब आणि अरुणाचल प्रदेश निर्मिती मद्याचा साठा पकडला ठाण्यात
By अजित मांडके | Published: March 14, 2024 04:43 PM2024-03-14T16:43:15+5:302024-03-14T16:43:44+5:30
01 कोटी 31 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक
ठाणे : महाराष्ट्रातून गुजरात राज्यात चाललेला पंजाब आणि अरुणाचल प्रदेश निर्मित मद्याचा साठा ठाणे जिल्ह्यातील नाशिक मुंबई रोडवरील कसारा नाका येथे पकडण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाला यश आले. या कारवाईत पंजाब येथील जसपाल तरसेमलाल सिंग (50) आणि गुरदयाल गुरदासराम सिंग (44) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे एकूण 01 हजार 502 बॉक्स, दोन मोबाईल आणि बाराचाकी ट्रक असा 01 कोटी 31 लाख 45 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची पूर्वतयारी असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी अवैध - नकली - परराज्यातील मद्याविरुध्द कारवाई करण्याच्या निर्देश दिले आहेत. त्यानुसार ठाणे आयुक्त डॉ निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मुंबई रोडवरुन परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने सापळा रचना 13 मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील नाशिक मुंबई रोडवरील कसारा नाका येथे ट्रकवर कारवाई केली. यावेळी चालकासह अन्य एक अशाप्रकारे दोघांना अटक करत मद्य साठ्यासह दोन मोबाईल फोन आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक संदिप जरांडे, रिंकेश दांगट, तसेच जवान केतन वझे, नारायण जानकर, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, भाऊसाहेब कराड, विजय पाटील, सागर चौधरी यांनी पार पाडली.
" ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची पूर्वतयारी असल्याचे म्हणता येईल. महाराष्ट्र राज्यामधून गुजरात येथे पंजाब आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातून हा मद्य साठा जात होता. या मद्याला महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र पंजाब आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात त्या मद्य विक्रीस बंदी नाही."
- डॉ नीलेश सांगडे, अधीक्षक,ठाणे राज्य उत्पादन शुल्क