बहुतांश मागण्यांना हिरवा कंदील मिळाल्याने टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला
By जितेंद्र कालेकर | Published: September 18, 2023 09:52 PM2023-09-18T21:52:47+5:302023-09-18T21:54:01+5:30
३३१ कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे: गणेशोत्सव आनंदात साजरा होणार
ठाणे: ठोक मानधनावर घेण्यासह बोनसचा वेतनात समावेश करावा, २० दिवसाला एक साप्ताहिक सुटी मिळावी अशा अनेक मागण्यांसह ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील (टीएमटी) ३३१ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एक आठवडयांपासून पुकारलेला संप सोमवारी सायंकाळपासून मागे घेतला. बहुतांश मागण्या मान्य झाल्याने हा संप मिटविण्यात यश आल्याची माहिती परिवहनचे सभापती विलास जोशी यांनी दिली.
संपाच्या आंदोलनात १२५ महिला तसेच २०६ पुरुष अशा ३३१ कंत्राटी चालक आणि वाहकांनी ८ सप्टेंबरपासून सहभाग घेतला होता. सोमवारी याच संदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे तसेच आंदोलकांचे प्रतिनिधी समीर भोसले यांच्यात आयुक्तांच्या दालनात चर्चा झाली. याच चर्चेमध्ये काही मागण्या मान्य करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना मिळणारा दिवाळी बोनस, ग्रॅच्युएटी, रजा वेतन आणि धुलाई भत्ता दरमहा रोखीत द्यावे, अशी मागणी होती. कर्मचाऱ्यांना जर बोनसची रक्कम वर्षाला एकदम नको असेल तर ती दर महिन्याला विभागून दिली जाईल.
जीएसटी बाबत केंद्र आणि राज्य सरकारशी बोलून , तोडगा काढला जाईल. २० दिवसांमध्ये एक साप्ताहिक सुटी देण्यात येईल. किमान वेतन आयोगाच्या तरतूदीनुसार नियमाप्रमाणे जी असेल ती वाढही दिली जाईल. कंत्राटी वेतनाबाबतची कंत्राटदाराकडून योग्य माहिती दिली जाईल. या मागण्यांना प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला. तर ठोक मानधनाची नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच असलेली मागणी मात्र अमान्य करण्यात आली. ती मान्य केल्यास पालिकेतील सर्वत्र कर्मचाऱ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आंदोलनामुळे कोणावरही कारवाई न करण्याचे आश्वासनही देण्यात आले. आता मागण्या मान्य झाल्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अडीच हजारांपर्यंत वाढ होणार असून १२ हजारांचे वेतन आता १४ ते १५ हजारांपर्यंत जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.