शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझा तलाव दिंडीतून पटवून दिले तलावाचे महत्त्व
By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 21, 2024 04:14 PM2024-03-21T16:14:31+5:302024-03-21T16:14:43+5:30
विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या.
ठाणे : जागतिक जल दिन २२ मार्च रोजी साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून गुरूवारी सकाळी ७:३० ते ९:०० या वेळेत तलावाचे महत्त्व तसेच पाण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा तलाव दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हि दिंडी ज्ञानप्रसारिणी शाळा ते साळवी तलाव या दरम्यान झाली. विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या.
ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे शहरात पूर्वी ६० तलाव होते आणि आता केवळ ४२ शिल्लक आहेत. हे लक्षात घेता तलाव संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२३ पासून माझा तलाव या चळवळीची सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना अग्रस्थानी ठेवून ही मोहीम राबवली जात आहे सप्टेंबर २०२३ पासुन ज्ञानप्रसारिणी शाळेने "साळवी तलाव" दत्तक घेतला आहे. शाळेतील इयत्ता ८ वी चे विद्यार्थी कळव्यातील पूर्वेला असणाऱ्या साळवी तलावावरती अभ्यास करत आहेत. यातूनच तलाव संवर्धनाची मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा तसेच पर्यावरण दक्षता मंडळ प्रयत्नशील आहे. संस्थेने एक महिनाभर आधी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना फलक कसे बनवावे याबाबत सांगितले गेले व विद्यार्थ्यांकडून घोषणा फलक बनवून घेतले होते.
या घोषणा देत त्यासोबतच काही विदयार्थ्यांनी तलावाभोवती असलेल्या वस्तीतील लोकांना तलावात कचरा टाकू नका असे सांगून तलावाचे महत्त्व सांगितले. तलावाच्या आजूबाजूच्या वस्तीत असणाऱ्या सर्वसामान्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत पर्यावरण दक्षता मंडळ राबवत असलेल्या माझा तलाव मोहिमेला पाठिंबा दिला. या दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक सुतार, देसले, नेने, पर्यावरण दक्षता मंडळ समन्वयक आणि माझा तलावाचे स्वयंसेवक असे एकूण ११५ सभासद सहभागी झाले होते.