रेल्वे स्थानकात आधी अतिरेकी शिरल्याची चर्चा... प्रत्यक्षात होते 'मॉकड्रील'
By जितेंद्र कालेकर | Published: September 23, 2022 05:31 PM2022-09-23T17:31:21+5:302022-09-23T17:31:52+5:30
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास अतिरेकी शिरल्याची वार्ता पसरली होती. अवघ्या काही वेळातच पोलिसांच्या कमांडोंसह बॉम्ब शोधक नाशक पथकाने रेल्वे स्थानकाचा ताबा घेत दोन अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये केवळ जुने वापरते कपडे असल्याचा निर्वाळा बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या श्वानाने दिला. त्यानंतर तणावाचे वातावरण निवळले. अतिरेकी किंवा अशी एखादी घटना घडली तर पोलिसांसह यंत्रणा किती सज्ज आहे, याची चाचपणी करण्यासाठी ही मॉकड्रील घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस ब्रिजखाली असलेल्या फलाट क्रमांक एक येथून दोन संशयित अतिरेकी हे रेल्वे स्थानकात शिरले आहेत अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला शुक्रवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास मिळाली. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागासह रेल्वे सुरक्षा दलाचे श्वानपथक, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांची जादा कुमक अवघ्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. नेमकी प्रकार काय घडला आहे, याची काहीच माहिती नसल्यामुळे मुंबई आणि कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवाशांमध्ये मात्र मोठी घबराट पसरली होती.
इकडे साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरामध्ये पोलिसांच्या वेगवेगळया पथकांनी दोन संशयितांना पकडल्यानंतर त्यांच्याकडील बॉक्स आणि प्लास्टीक पिशवीची रेल्वेच्या श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत केवळ जुने वापरते कपडे मिळाल्याने सवार्नी सुटकेचा नि:श्वास सोडला.अतिरेकी कारवाया संबंधी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास कशी तत्परतेने कारवाई केली जावी, याचे मार्गदर्शन यावेळी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. जी. खंदारे यांच्या पथकाने केले. त्यानंतर ही केवळ एक मॉकड्रील होती, असेही विविध यंत्रणांना सांगण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.