उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध; शिक्षक टाकणार आमदार निवडणुकीवर बहिष्कार
By सदानंद नाईक | Updated: January 20, 2023 17:53 IST2023-01-20T17:52:50+5:302023-01-20T17:53:31+5:30
उल्हासनगर ITI कॉलेजच्या संरक्षण भिंतीला विरोध केल्याने शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत.

उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध; शिक्षक टाकणार आमदार निवडणुकीवर बहिष्कार
उल्हासनगर: कॅम्प नं-३ आयटीआयच्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्याला काही समाजकंटकानी विरोध केल्याने, भूमाफियांचा जागेवर डोळा गेल्याची चर्चा सुरू झाली. आयटीआयची जागा वाचविण्यासाठी मुख्याध्यापक बोरसे यांनी थेट मुख्यमंत्री यांना साकडे घालून शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे निवेदनात म्हटले.
उल्हासनगरात विठ्ठलवाडी पोलीस वसाहत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मैदान, महापालिका शाळा मैदान, शासकीय कार्यालये, खुल्या जागा, सामाजिक संस्था आदी जागेवर सनद मिळाल्या असल्याने, सामान्य नागरिकांत सनद बाबत संभ्रम निर्माण झाले आहे. अशाच प्रकार आयटीआय बाबत झाला तर नाही ना? असा प्रश्न उभा ठाकला आहे. आयटीआय विद्यालय भोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेची मोजणी करून भिंत बांधण्यास सुरवात केली. असे निवेदनात म्हटले. मात्र काही समाजकंटकानी भिंत बांधण्याला विरोध केला असून याप्रकाराने आयटीआयच्या खुल्या जागेवर भूमाफियांच्या डोळा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान २० जानेवारी रोजी आयटीआयचे लेटरपॅडवर आयटीआयचे मुख्याध्यापक एस पी बोरसे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून झालेल्या घटने बाबत माहिती दिली.
आयटीआयची जागा बळकाविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात व्यक्त केला असून शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. याप्रकारने शासकीय भूखंडाला भूमाफियांचे ग्रहण लागल्याचे बोलले जात असून अश्या भूमाफियावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. य मुख्याध्यापक बोरसे यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, एकच खळबळ उडाली आहे.