आनंदाश्रमाजवळील टेंभी नाक्याच्या शाळेला ना छप्पर, ना प्रयोगशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:13 AM2023-07-18T09:13:24+5:302023-07-18T09:16:44+5:30

पालिकेच्या शाळा की कोंडवाडे...

The Tembhi Nakaya school near Anandrashram has neither a roof nor a laboratory | आनंदाश्रमाजवळील टेंभी नाक्याच्या शाळेला ना छप्पर, ना प्रयोगशाळा

आनंदाश्रमाजवळील टेंभी नाक्याच्या शाळेला ना छप्पर, ना प्रयोगशाळा

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : टेंभी नाका ठाणेकरांचा मानबिंदू. स्व. आनंद दिघे यांचा आनंदाश्रम व त्यांची समाधी येथेच आहे. येथून हाकेच्या अंतरावर ठाणे महापालिकेची १७ क्रमांकाची शाळा आहे. ही शाळा आहे की कोंडवाडा, असा प्रश्न शाळा पाहिल्यावर पडताे. 

शाळेत तळमजल्यावर गुजराती, तर पहिल्या मजल्यावर मराठी माध्यमाची शाळा भरते. तेथे सिमेंट काँक्रिटचे छप्पर नाही. पत्रे टाकले आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही उकाड्याने विद्यार्थी त्रस्त होतात. उन्हाळ्यात वर्गात बसणे ही तर शिक्षाच. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांना बसायला शाळेत स्वतंत्र व्यवस्था नाही. शाळेत प्रयोगशाळा नाही. इमारतीमधील जवळपास प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये जुने, तुटके बेंच, टेबल, खुर्च्या व वेगवेगळे भंगार सामान टाकून ठेवले आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शाळेची ही दुरवस्था. 

लाखाेंची विद्यार्थी 
संख्या हजारात आली
ठाणे महापालिका शाळांचा दर्जा मात्र खालावत चालला आहे. महापालिका शाळांतील पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, शाळांची दुरवस्था प्रचंड वाढली आहे. ठाणे महापालिकेच्या शाळा १३० आहेत. पूर्वी लाखोंच्या संख्येने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम २७ ते २८ हजारांच्या आसपास आली आहे. एका इमारतीत एकापेक्षा अधिक शाळा चालविल्या जातात. पटसंख्या कमी होत असली तरी शाळा दुरुस्तीचा खर्च वाढतच चालला आहे. 

विद्यार्थी गुणवान; 
पण शाळांची स्थिती दयनीय
समर्थ भारत संस्थेने २००८-०९ साली ठाणे महापालिका शाळांची पाहणी केली. त्यावेळी लक्षात आले की, विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहेे; पण शाळांची परिस्थिती वाईट आहे. कोट्यवधींचे बजेट मंजूर केले जाते. पण पायाभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. 
- सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

एकाच शाळेत १४ शाळा

ठाणे (पूर्व) येथील शाळा क्रमांक १६ मध्ये तब्बल १४ शाळांचा समावेश आहे. या शाळेतील जवळपास प्रत्येक भिंतीवर पाणी गळती आहे. शाळेची संरक्षक भिंत कधीही पडू शकते, अशा अवस्थेत आहे. मागच्या बाजूस अस्वच्छता आणि भंगार सामान ठेवण्यात आले आहे. 
भिंतींचे पापुद्रे निघालेले आहेत. शाळेला वर्षानुवर्षे रंगरंगोटी नाही, भिंतींना भेगा, खिडक्यांवर जळमटे आहेत. पावसाचे पाणी आत येते. शाळेच्या वरच्या मजल्यावरील शौचालयांची दारे तुटलेली आहेत. 

मुले, मुली त्याचा वापर करू शकत नाहीत. शौचालयांच्या आजूबाजूला शेवाळ आहे. अनेकदा विद्यार्थी पाय घसरून पडतात. शाळेत स्लॅबचा भाग पडलेला आहे. मुंब्रा स्टेशनजवळील शाळा हे तर प्रचंड उपेक्षेचे आगारच आहे. मुंब्रा बाजारपेठ येथील महापालिकेच्या शाळेत शौचालयाच्या बाजूला हात धुण्यासाठी असलेल्या बेसिनमधून पहिला आणि दुसरा मजल्यावर पाण्याच्या पाइपमधून गळती होते. वर्गाच्या बाहेर पाणी सांडते. मुंब्र्यातील शाळेतील असुविधांची भली मोठी यादी आहे. शाळेच्या आवारात खेळण्यासाठी तयार करण्यात आलेले साहित्य गंजल्याने खराब झाले आहे.

Web Title: The Tembhi Nakaya school near Anandrashram has neither a roof nor a laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.