तणाव वाढला! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 09:03 PM2024-08-10T21:03:02+5:302024-08-10T21:07:53+5:30
बीडच्या घटनेचे पडसाद ठाण्यात उमटले, उद्धव ठाकरेंच्या वाहनावर मनसैनिकांचा हल्ला
ठाणे - बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर या घटनेचे पडसाद ठाण्यात पाहायला मिळाले आहेत. ठाण्यात आज उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा होता मात्र याठिकाणी मनसैनिकांनी मोठा राडा केलेला आहे. मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण फेकले आहे. त्यामुळे इथं मोठा तणाव निर्माण झाला.
ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं उद्धव ठाकरेंचा मेळावा होता. मात्र या मेळाव्याच्या ठिकाणीच मनसे कार्यकर्ते यांनी गोंधळ घातला. यावेळी महिला आंदोलकांचाही मोठा सहभाग होता. संतप्त कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण फेकले. त्यामुळे तणाव वाढला यात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धव ठाकरेंची सभा होती. त्यावेळी मनसे कार्यकर्ते सभास्थळी घुसले. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. जवळपास ५० ते ६० मनसे कार्यकर्ते इथं आल्याने तणाव निर्माण झाला. यात महिला कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. उद्धव ठाकरे गडकरी रंगायतनाच्या दिशेने येत असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यानंतर थेट गडकरी रंगायतन येथे घुसून मनसेने गोंधळ घातला.
राज ठाकरेंनी दिला होता इशारा
माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जरांगे पाटील यांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्या या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत. काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्या नादी लागू नका. नाहीतर माझी पोरं काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही असा आक्रमक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेत दिला.