ठाण्यामध्ये बर्निंग कारचा थरार; नितीन उड्डाणपुलावरील घटना, पाऊण तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:57 AM2024-03-19T11:57:43+5:302024-03-19T11:58:12+5:30
घाटकोपरचे दीपक गवळी यांच्या मोटारीने घेतला पेट
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबई-नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलावर एका माेटारकारला सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीतकारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले. आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीच्या घटनेने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली.
घाटकोपरचे रहिवासी असलेले दीपक गवळी वाघबीळकडे डेकाेरेशन साहित्य घेऊन मोटारीने निघाले होते. नितीन कंपनी उड्डाण पुलावर आल्यावर त्यांच्या मोटारीने पेट घेतला. ही माहिती मिळताच पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर वाहनासह, रेस्क्यू वाहन, वॉटर मिक्स फायर टेंडर वाहनाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. कारमधून दीपक हे एकटेच प्रवास करीत होते. पेट घेतलेली मोटार रस्त्याच्या एका बाजूला नेल्यावर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.