सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेचा खोळंबा, यार्डातून गाडी पकडून न दिल्याने प्रवाशांचा संताप
By पंकज पाटील | Published: June 28, 2023 10:16 AM2023-06-28T10:16:03+5:302023-06-28T10:16:53+5:30
अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकलमध्ये शिरून जागा पकडतात.
अंबरनाथ: अंबरनाथहून सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने बुधवारी पुन्हा रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. मंगळवारी देखील याच वादातून रेल रोको झाले होते.
अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सकाळच्यावेळी अनेक लोकल सोडल्या जातात. यातील काही लोकल अंबरनाथ येथील रेल्वे यार्डात उभ्या असतात. अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकलमध्ये शिरून जागा पकडतात. त्यांनतर लोकल फलाटावर येते. मंगळवारी आणि बुधवारी नेहमीप्रमाणे काही प्रवासी लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी यार्डात पोहोचले.
काही प्रवाशांनी लोकलमध्ये जागा मिळवली होती. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना लोकलमधून उतरून फलाटावर जाऊन लोकल पकडण्याचे सुचवले. यातील अनेक प्रवाशांनी सुरुवातीला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना विरोध केला. त्यानंतर काही प्रवासी संतप्त झाले. आज बुधवारी पुन्हा रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात गोंधळ घातला.
नेहमीप्रमाणे हे प्रवासी यार्डातून लोकल पकडण्यासाठी गेले होते. मात्र रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी आधीच तैनात असल्यामुळे त्यांनी या प्रवाशांना लोकलमध्ये बसण्यास मज्जाव केला त्यातूनच रेल्वे सुरक्षा बल आणि प्रवासी यांच्याच वादावादी सुरू झाली. अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी वाद घालणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ताब्यात घेतले आणि रेल्वे सेवा सुरळीत केली.