ठाण्यात दुभाजकाला धडक देत ट्रक उलटला; २७ टनाची कॉईल पडली रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 04:38 PM2022-01-19T16:38:13+5:302022-01-19T16:40:19+5:30
घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ एका ट्रकने रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन उलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी त्या ट्रकमधून आॅईल रस्त्यावर पसरल्याने या ट्रकमधील २७ टन वजनाची लोखंडी कॉईल खाली पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ एका ट्रकने रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन उलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी त्या ट्रकमधून आॅईल रस्त्यावर पसरल्याने या ट्रकमधील २७ टन वजनाची लोखंडी कॉईल खाली पडली. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळी या मार्गावर तीन ते चार तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मदत कार्य राबवून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कॉईल उचलण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
किशोर दांगट यांच्या मालकीचा ट्रक त्यांचा चालक कॉईल घेऊन जेएनपीटी येथून घोडबंदर रोडने अहमदाबादकडे जात होता. गायमुख जकात नाक्याजवळ आल्यावर या ट्रकने पहाटेच्या सुमारास एका दुभाजकाला धडक दिली. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रक ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाºया मार्गिकेवर जाऊन उलटला. याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि वाहतूक शाखेच्या कासारवडवली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तातडीने ट्रक आणि त्यातून पडलेली कॉईल हटविण्याचे तसेच रस्त्यावर पसरलेल्या आॅईलवर माती पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले. याचदरम्यान ठाण्याकडून जाणारी वाहतूक ठाण्याकडे येणाºया मार्गिकेवर वळविण्यात आली होती. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पडलेली २७ टनाची कॉईल मोठया क्रेनच्या सहाय्याने अन्य एका ट्रेलरवर ठेवण्यात या पथकांना यश आले. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला होता. धीम्या गतीने वाहतूक सुरु राहिल्याने ती पूर्णपणे बंद नव्हती. परंतू, काही काळ त्याचा परिणाम वाहतूकीवर झाल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. कॉईल उचलण्यात आल्यानंतर वाहतुक दोन्ही मार्गिकेवरून पूर्ववत केल्याचेही त्यांनी सांगितले.